
मॅरेथॉन चा थोडक्यात इतिहास व माहिती
एक शहर आहे ग्रीक नावाच्या देशामध्ये. तसे हे शहर अगदी प्राचीन आहे. सध्या या शहराचा आवाका साधारण १०० वर्ग किमी इतका आहे. इस वी सनापुर्वी ४९० या साली या शहरामध्ये एक महान युध्द झाले. हे युद्ध ॲथेन्स मधील काही मोजके सैन्य व बलाढ्य, संख्येने खुपच जास्त असणा-या पर्शियन लष्करामध्ये लढले गेले. पर्शियन सैन्याने, या शहरावर आक्रमण करण्यापुर्वी अनेक युद्धे जिंकली होती. ही सर्व युध्दे जिंकल्याच्या बातम्या संपुर्ण ग्रीकमध्ये पसरलेल्या होत्याच. व त्यामुळे ॲथेन्सचे संख्येने कमी असलेले सैन्य , हे युध्द हरणार अशीच भाकिते सर्वत्र वर्तविली जात होती. ॲथेनीयन सैन्य दहा हजाराच्या आसपासच होते व पर्शियन सैन्य मात्र दोन – अडीच लाखांचे होते. त्यामुळे युध्द सुरु होण्यापुर्वीच संदेश संपुर्ण ग्रीकमध्ये प्रसारीत केले गेले होते की जेणेकरुन वेळेत कुमक मिळावी.
पण प्रत्यक्ष युद्धाचा मात्र अनपेक्षित निकाल लागला. पर्शियन सैन्याचा सपशेल पराभव झाला. या शहरापासुन ॲथेन्स म्हणजे राजधानी २४० किमी अंतरावर होती. व राजधानी ला विजयाचा निरोप वेळेत पोहोचणे गरजेचे होते. त्यासाठी फिडीपाईड्स नावाच्या एका सैनिकास ही कामगिरी सोपवण्यात आली. कुठेही न थांबता फिडीपाईड्स ॲथेन्स पर्यंत पोहोचला व दरबारामध्ये जाऊन “आपला विजय झाला” एवढेच बोलुन त्याने प्राण सोडले.
त्याने पळण्याची सुरुवात ज्या शहरामधुन केली त्या शहराचे नाव तुम्हाला माहित आहे का?
त्या शहराचे नाव आहे मॅरेथॉन. मॅरेथॉन हे प्राचीन ग्रीक मधील एक शहर की जिथे ॲथेन्स व पर्शियन सैन्यामध्ये भयंकर युध्द झाले व त्यात ॲथेन्स चे सैन्य जिंकले. हा विजयाचा संदेश घेऊन फिडीपाईड्स, जिवाचा आकांत करीत, धावत धावत, कुठेही न थांबता , ॲथेन्स या मुख्य शहरापर्यंत पोहोचला व, जो निरोप द्यायचा होता तो देऊन, अगदी दोन-तीन शब्दांमध्येच,, हा धावपटु गतप्राण झाला.
या ऐतिहासिक कथेमध्ये थोडे-बहुत वेगळेपण विविध लेखकांच्या लिखाणामध्ये दिसते. तरीही सर्व अभ्यासक एकमुखाने हे मान्य करतात की फिडीपाईड्स या सैनिकाच्या त्या २४० किमी धावण्यामुळे व निरोप-संदेश देण्यामुळेच, पृथ्वीवर मॅरेथॉन नावाच्या जागतिक धावण्याच्या स्पर्धेची सुरुवात झाली. आपण या कथेतील सत्यासत्यतेच्या फंदात न पडता, एवढेच समजुन घेऊ की, फिडीपाईड्स च्या मॅरेथॉन शहरापासुन ॲथेन्स पर्यंत धावण्याच्या पराक्रमामुळेच व त्याच्या स्मृतिप्रित्यर्थ्य मॅरेथॉन ही धावण्याची स्पर्धा सुरु करण्यात आली.

मॅरेथॉन रोड वरील फिडीपाईड्स चा पुतळा
हा लिखित इतिहास वगळता धावत जाणे किंवा अशी शर्यत भरवणे यांचा इतिहासामध्ये (प्राचीन) उल्लेख नाहीये. तरीही साधारणपणे धावणे व न थांबता लांब पल्ल्याची अंतरे धावणे हे अगदी आदिम काळापासुन एक कौशल्य म्हणुन संपुर्ण जगभर विकसित केले जायचे. अश्मयुगाचा विचार केला शिकार करण्यासाठी जेव्हा हत्यारांचा शोध लागला नव्हता तेव्हा, ज्या प्राण्याची शिकार करायची आहे त्या प्राण्याचा पाठलाग करणे, त्याला थकवणे, इतका थकवणे की एक वेळ येते अशी तो प्राणी फुफ्फुस फुटून मरत नाही तोपर्यंत त्याच्या मागे धावणे. ही अंतरे कित्येक मैलांची देखील असायची. पुढे जशजशी दुर अंतरावरुन शिकार करण्यासाठीच्या हत्यारांचा शोध लागला तस तशी धावण्याची गरज कमी होऊ लागली. तरीही अगदी तीर-कमानीने जरी शिकार करयची म्हंटली तरी धावणे व्हायचेच.
या व्यतिरिक्त, एका ठिकाणावरुन संदेश दुस-या ठिकाणी, ताबडतोब (कमीतकमी वेळात) पोहोचवण्यासाठी, पुर्वी घोडेस्वारांपेक्षा जास्त मागणी लांब पल्ल्याची अंतरे धावणा-यांची असायची. विविध साम्राज्यांमध्ये अशा धावकांसाठी राखीव कोटा असायचा.
त्यामुळे धावणे माणसास काही नवीन गोष्ट नाहीये, हे आपणास आता समजले असेलच.
हल्ली संपुर्ण जगभरात, विविध देशांमध्ये, अनेकानेक शहरांमध्ये मॅरेथॉन स्पर्धा भरवणे, धावकांना प्रोत्साहन देणे, बक्षिसे देणे असे आपण पाहत आहोत. आपल्या शहरात देखील अगदी प्रत्येक आठवड्याला एक तरी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली जातेच. मॅरेथॉन ही नुसती स्पर्धा न राहता हल्ली एक संस्कृती झाली आहे. मॅरेथॉन जात, पंथ,भाषा, देश, वर्ण आदी भेदांच्या भिंती पाडणारी एक आधुनिक संस्कृती आहे. जसे सभ्य समाजाच्या निर्मितीमध्ये मॅरेथॉन स्पर्धा भर घालते तसेच सुदृढ समाज निर्मिती साठी खुप मोलाचे योगदान मॅरेथॉन देत असते.
मॅरेथॉन मध्ये भाग घेतला म्हणुन लोक किमान एखादा महिना अगोदर धावण्याचा सराव करतात. अनेकांना माहित असते की आपण जिंकणार नाही तरीह देखील ते सराव करतातच. जिंकणे महत्वाचे नसुन भाग घेणे महत्वाचे आहे. त्यातही सर्वांचा भर असतो तो फिनिश लाईन ओलांडण्याकडे. नुसता भागच घ्यायचा नाही तर त्या स्पर्धेतील संपुर्ण अंतर धावुन पुर्ण करणे म्हणजे खुप मोठी कमाई आहे.
जगभरात मॅरेथॉन चे मापदंड समानच आहेत. मॅरेथॉन म्हणजे मुख्य मॅरेथॉन चे अंतर 42.2 किमी म्हणजेच साडे सव्वेस मैल इतके आहे. इतक्या अंतराच्या स्पर्धेस मॅरेथॉन म्हणतात. यापेक्षा कमी अंतरांच्या स्पर्धा देखील भरविल्या जातात जसे हाफ मॅरेथॉन, मिनि मॅरेथॉन इत्यादी.
मॅरेथॉन मध्ये भाग का घ्यावा
मॅरेथॉन मध्ये भाग, ही स्पर्धा जिंकण्यासाठी फारसे कुणी घेत नाहीत. जे जिंकणारे असतात ते सचोटीने सराव करतात. वेळेची गणिते सांभाळतात. स्वतःला योग्य व पोषक आहार घेतात. जीवनशैली मध्ये आमुलाग्र बदल करतात. फास्ट-फुड सारख्या गोष्टींपासुन लांब राहतात. पण सामान्य माणसाला हे सगळे करणे जिकिरीचे वाटु शकते. त्यामुळे सामान्य माणसाने काय अशा स्पर्धांमध्ये भागच घेऊ नये का?
तर नक्की घ्यावा. याची काही कारणे मी खाली देत आहे.
-
एवढे मोठे अंतर एकदातरी धावणे अशी अनेकांची एक सुप्त इच्छा असते. हे स्वप्न पुर्ण होण्यासाठी देखील अनेक जण भाग घेतात
-
कित्येकदा या स्पर्धांचे आयोजक, यातुन उभा राहणारा पैसा एखाद्या सामाजिक कार्यासाठी , देणगीसाठी वापरतात. त्यामुळे तुम्ही जर या स्पर्धांमध्ये भाग घेतला तर तुम्हाला दुहेरी आनंद मिळणार
-
नवनवीन लोकांच्या ओळखी होतात
-
नियमित पणे धावण्याने तुमचा आत्मविश्वास कमालीचा वाढतो. व हा वाढलेला आत्मविश्वास तुम्हाला तुमच्या करीयर मध्ये देखील यशस्वी करतो
-
तंदुरुस्ती मिळविणे व शाबुत ठेवणे
-
काहीतरी नवीन मिळवल्याचे समाधान मिळवणे
-
सर्वात मह्त्वाचे म्हणजे आपले दोन्ही पाय अजुन ही काम करतात, त्यांनी आपण धावु शकतो म्हणुन देखील अनेक जण धावतात
सध्या आपल्या शहरामध्ये अशा स्पर्धांचे आयोजन खुप मोठ्या प्रमाणात केले जात आहे. विविध कॉर्पोरेटस यामध्ये समाविष्ट होताना आज दिसतात. हे आपल्यासाठी नक्कीच खुप चांगले आहे. पुणे विविधांगांनी वृध्दींगत होत आहे. शहराच्या पसारा नुसता भौगोलिक सीमा वाढवण्याचा नसुन कला-गुण-क्रिडा आदी मध्ये देखील पुणे अव्वल आहे. अव्वल यासाठी की पुण्यात अशा स्पर्धांचे आयोजन खुपच मोठ्या प्रमाणात सुरु आहे.
पुण्यामध्ये कधी-कुठे कोणती मॅरेथॉन आहे हे समजुन घेण्यासाठी तुम्हाला गुगलचा उपयोग होऊ शकतो. विविध सोशल मीडीयांवर देखील याविषयी माहिती मिळु शकते. आमच्याकडे जर तुम्ही ‘मॅरेथॉन अलर्ट’ साठी नोंदणी (व्हॉट्सॲपवर) केली तर आम्ही तुम्हाला याविषयी माहिती नक्की देऊ.
विचार कसला करताय मग. शोधा तुमच्या परीसरातील मॅरेथॉन कुठे आहे ते व नावनोंदणी करुन धावा.
आशा करतो जी हा लेख तुम्हाला आवडला असेल. लेख जास्तीत जास्त शेयर करा जेणेकरुन हा स्वास्थ्य संस्कार अनेकांपर्यंत पोहोचेल.
या वेबसाईटच्या माध्यमातुन, पुणेकरांचना सतत तंदुरुस्त राहण्यासाठी प्रोत्साहन देणे हा आमचा हेतु आहे. विद्येचे माहेर घर असणारे पुणे तंदुरुस्तीसाठी देखील नावारुपास यावे ही अपेक्षा आहे.
चला तर मग निरामय निरोगी जीवन जगण्याचा निर्धार करु व व्यायाम आपल्या सवयीची भाग बनवुयात.
कळावे
आपले
महेश व पल्लवी ठोंबरे – 9923062525