
खेळाडु व लॉकडाऊन – १
नमस्कार मित्रांनो,
मध्यंतरी माझ्या एका मित्राशी गप्पा मारता मारता सहजच त्याच्याकडुन एक आश्चर्यकारक माहिती मिळाली. माझ्या या मित्राची मुलगी कबड्डी या खेळा मध्ये मध्ये राष्ट्रीय संघांमध्ये स्थान मिळवुन देखील, एक देखील सामना खेळु शकली नाही.
एकतर अशी संधी मिळण्यासाठी खुपच परिश्रम करावे लागतात. कोणत्याही खेळाडुच्या यशामध्ये परिश्रम फक्त त्या खेळाडुचेच असतात असे नसुन त्या संपुर्ण कुटूंबाचे असतात. शिक्षकांचे असतात. क्रिडा शिक्षकांचे असतात. त्यामुळे साहजिकच एखाद्या खेडाळुस अशी संधी मिळते, असे यश मिळते तेही भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात, तेव्हा ‘भरुन पावल्याचे’ समाधान सर्वांनाच होत असते.
मित्राच्या मुलीच्या बाबतीत जे काही घडले ते काही तिच्या एकटीच्याच बाबतीत घडत आहे असे नाही. या परिस्थीतीमधुन हजारो खेळाडु, त्यांची कुटूंबे, शिक्षक, मार्गदर्शक असे सारेच जात आहेत.
दुती चंद नावाची अशीच एक उदयोन्मुख खेळाडु आहे. सन २०१८ मधील एशियन गेम्स मध्ये तिने भारतासाठी गोल्ड मेडल मिळविले आहे. आणि २०२० मध्ये प्रवेश करतानाच तिने पक्का निर्धार केला होता की या वर्षी होणा-या टोकियो ऑलिंपिक मध्ये भारतासाठी सुवर्णपदक मिळवायचेच. सरकारने तिच्या तयारीसाठी चक्क दहा तज्ञांची टीमच तयार केली होती. यात कोच, असिस्टंट कोच, फिजियोथेरपीस्ट असे लोक आहेत. पण जसे कोरोना मुळे जगभर हाहाकार सुरु झाला, आणि एका मागुन एक सार जगच लॉकडाऊन झाले, टोकियो ऑलिंपिक पुढे ढकलले गेले, तसे तिच्या तसेच तिच्या संपुर्ण टीम मध्येच निराशा आली. तिचा सराव म्हणजे तब्बल आठ तासाचा अभ्यास होय.
एका पत्रकाराने जेव्हा तिला विचारले की या लॉकडाऊनचा तिच्या एकंदरीत कामगिरीवर काय परिणाम होईल तेव्हा तिने सांगितले की, तिने सलग काही दिवस सराव, व्यायाम, धावणे केले नाही ते २०१४ मध्ये. तेव्हा तिला दोन महिने सराव , ट्रेनिंग करता आले नव्हते. दोन महिने झाल्यावर मात्र जेव्हा तिने पुन्हा सुरुवात केली व्यायामाला व ट्रेनिंग ला तेव्हा तिला पुन्हा पहिल्यासारखाच सुर गवसण्यासाठी साधारण आठ महिने लागले होते. ती पुढे म्हणते की विचार करा, लॉकडाऊनच्या या चार महिन्यांमुळे माझे व देशाचे किती नुकसान होईल.
लॉकडाऊन ने ज्याप्रमाणे सर्वच क्षेत्रातील सर्वच लोकांवर विपरीत व आवडणार नाही असा परिणाम केला आहे तसेच खेळाडु लोकांवर देखील या लॉकडाऊनचा विपरीत परिणाम झाल्यावाचुन राहिलेला नाहीये. एक खेळाडु म्हणजे ऊर्जा व स्फुर्तीचा अखंड स्त्रोत, एक अखंड प्रवाहच होय. पण या खळाळत वाहणा-या प्रवाहाला देखील लॉकडाऊन मुळे थांबावे लागले. सामान्य लोकांसमोरील अडचणी सामान्य होत्या. पण खेळाडुं समोरील आव्हाने आणखीनच बिकट स्वरुपाची होती व अजुनही आहेत. त्यांचे सर्वात महत्वाचे आव्हान होते ते म्हणजे चार भिंती मध्ये स्वतःला बंदिस्त करुन घेणे. जसे सर्वांनी स्वतःला बंद करुन घेतले तसेच खेळाडुंनी देखील केले. असे बंदिस्त असताना स्वतःची फिटनेस सांभाळणे व खेळातील प्राविण्य टिकवुन ठेवणे या काळात खुपच अवघड होऊन बसले आहे.
सोशल डिस्टंसिंग मुळे कोचिंग मिळवणे अवघड होत आहे. देशव्यापी लॉकडाऊन जरी शिथील झाला आहे तरी प्रादेशिक लॉकडाऊन व कोविड१९ चा वाढता प्रादुर्भाव यामुळे अजुनही खेळांडुंना स्वतःला लॉकडाऊनच करुन ठेवावे लागत आहे.
काही दिवसांपुर्वी खेळ मंत्रालयाने विविध खेळ व सराव पुन्हा सुरु करण्याहे सुतोवाच केले होते. यावर अनेक प्रतिक्रिया आल्या. अनेकांनी याचे स्वागत केले तर काही जणांनी मात्र याला उतावळेपणा म्हंटले.
शुटींग चॅंपियन संजीव राजपुत चे देखील असेच काहीसे मत आहे. तिरंदाजीतील चॅम्पियन अभिषेक वर्मा तसेच भारतासाठी वैयक्तिक बॉक्सिंह स्पर्धेत पहिले सुवर्ण पदक कमाविणारा विजेंदर सिंग म्हणतात की कोरोना विषाणु ही अशी एक समस्या आहे की जिचा नीटसा थांग मनुष्यास अद्याप लागलेलाच नाही. इथे मनुष्याचे भविष्य अंधारात असताना आपण फक्त खेळ व खेळाडु यांचाच विचार नाही केला पाहिजे. आपण अधिक संमजस पणा दाखवत माणुसकी सोबत उभे राहिले पाहिजे.
एकंदरीतच खेळांस सुरुवात करण्यामध्ये मतभेद तज्ञांमध्ये आहेतच.
माझे स्वतःचे मत मी इथे थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करतो. माझ्या अभ्यासानुसार या विषाणुच्या बाबतीत ठोस औषध म्हणजे लस शास्त्रज्ञांस अद्यापही सापडलेली नाही. माझा एक मित्र अमेरीकेत आहे. त्याच्याशी देखील वरचे वर माझे बोलणे सुरु असते. मागील आठवड्यात्च तो म्हणाला की हा विषाणु म्युटेट करण्याची क्षमता असलेला आहे. त्यामुळे याला, याच्या परिणामांना, लक्षणांना, धोक्यांना प्रेडिक्ट करता येत नाही. काही ठराविक लक्षणांच्या आधारे लस बनविणे सुरु केले तर हा विषाणु नवीनच रुपाने समोर येतो. माझा तो शास्त्रज्ञ मित्र म्हणाला की, अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर हा विषाणु सोंगाड्या आहे. याला ओळखणे सोपे नाही. आणि ओळखले तरी इलाज शोधेपर्यंत या तिसरेच रुप धारण करतो. यामुळे कोरोना विषाणु ही समस्या अखिल मानवतेसमोरील एक गहरी समस्या होऊन बसली आहे. या समस्येपासुन वाचायचे असेल तर तीन महत्वाच्या गोष्टींचे पालन खुप गरजेचे आहे.
- सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे
- वारंवार हात धुणे
- तोंड व नाक बांधुनच घराबाहेर पडायचे.
भारतातील प्रतिष्ठीत, ज्येष्ठ उद्योजक श्री रतन टाटा यांचे एक वाक्य मला यावेळी आपणा सर्वांना सांगावेसे वाटते. त्यांनी हे वाक्य उद्योजकांना उद्देशुन बोलले होते. पण मला वाटते की हे वाक्य नुसते उद्योजकांनाच नाही तर सर्वसामान्य लोकांना देखील लागु पडते.
“कोरोनाचा काळ हा कडक परिक्षेचा काळ आहे. आपल्या सगळ्या क्षमतांचा कस पाहणारा काळ आहे. या काळात आपल्यासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे जिवंत राहणे (उद्योगांनी) . प्रगती, व्यवसायातील वाढ, नफा हे तेव्हाच मिळेल जेव्हा आपण जिवंत राहु! ” हे वाक्य असेच्या असे सर्वच क्षेत्रांना लागु होते.
आणि खेळक्षेत्र, खेळाडु हे देखील माझ्या मते वेगळॅ नाहीयेत. जान है तो जहान है! त्यामुळे प्रत्येक खेळाडु ने आपले काय नुकसान झाले याचा विचार करुन काळजी करीत बसु नये. मग खेळाडुंनी आपली मानसिकता व शारीरीक क्षमता कशी बरे व्यवस्थित ठेवावी या लॉकडाऊन च्या काळात?
असेच प्रश्न माझ्या त्या मित्राला देखील पडले होते. मी माझ्या परीने त्याच्या शंका, प्रश्नांचे समाधान केले व त्याला व त्याच्या मुलीला देखील माझे म्हणणे पटले. मी त्यांना काय सांगितले? नेमके हेच वाचा माझ्या पुढील लेखामध्ये!
या वेबसाईटच्या माध्यमातुन, आरोग्य विषयक अतिशय महत्वाची, क्लिष्ट अशी माहिती सहज सोपी करुन वाचायला मिळत आहे असे अनेक अभिप्राय येत असतात. सोबतच वाचक एखाद्या विशिष्ट विषयावर देखील मार्गदर्शन मिळावे म्हणुन व्यक्तिशः संदेश पाठवत असतातच. वाचकांच्या सुचनांनुसार, त्या त्या विषयावर मी वेळोवेळी लिहित असतोच.
कळावे
तुमचा
महेश ठोंबरे
9923062525