
मधुमेह…नको नको
उजळणी
मधुमेहाविषयीच्या माझ्या पहील्या लेखातील ते वयस्कर धनगर आजोबा आठवतात का? त्यानंतरच्या लेखामध्ये आपण मधुमेहाचे दोन प्रकार पाहिले. आठवुन पहा. नसेल आठवत तर लिंकवर क्लिक करुन दोन्ही लेख पुन्हा वाचा.
हे दोन्ही लेख व त्यातील माहितीला उजाळा देण्याचे कारण आहे. भारतामध्ये सर्वात जास्त मधुमेहाचा प्रकार आहे तो म्हणजे प्रकार दोनचा मधुमेह. त्यालाच प्रौढ मधुमेह असेही म्हंटले जाते. या प्रकारास असे प्रौढ मधुमेह म्हणण्याचे देखील खास कारण आहे. आपण जर ते नीट समजुन घेतले तर आपण अशा प्रकारचा मधुमेह आपणास होणारच नाही याची काळजी अवश्य घेऊ शकतो. पण आपले दुर्दैव असे आहे की, आपल्या शालेय किंवा महाविद्यालयीन शिक्षणामध्ये, या भयावह अशा रोगाविषयी जागरुकतेसाठी अजिबात स्थान नाही. होय, प्रकार दोनचा जो मधुमेह आहे त्याचा अगदी सोपा इलाज आहे. व तो म्हणजे हा मधुमेह होऊ न देणे.
मधुमेहाची परीणती
वयाच्या ३५शी ४०शी नंतर साधारण पणे होणारा हा मधुमेह, एकदा का आपल्याला झाल्याचे समजले की आपली निम्मी अधिक ऊर्जा , समजता क्षणीच संपते. आपण आपल्या आजुबाजुला अनेक उदाहरणे पाहीलेली असतात. कधी डयबेटीज असलेल्या माणसांना अचानक चक्कर येते, कधी अशा रुग्णांना एखादी जखम झाली तर ती लवकर बरी होत नाही. कधी आपण असे ही ऐकतो की, मधुमेही रुग्णांना अचानक हृद्यविकाराचा झटका आला व त्यातच त्याचा शेवट झाला. हृद्यविकाराच्या पहील्याच झटक्यात रुग्ण प्राण गमावतो. याचे कारण असे की मधुमेह म्हणजे अनेक आजारांचे माहेरघर. वर सांगितल्या प्रमाणे व या व्यतिरिक्त अनेक आजार मधुमेह त्याच्या सोबत आपल्या शरीरात घेऊन येतो. त्यामुळे एकेक आजाराची लक्षणे वरकरणी दिसत नाहीत. ती सुप्तावस्थेमध्ये शरीरामध्ये लपुन बसलेली असतात. व एखादेवेळी मधुमेही रुग्णाच्या खाण्यापिण्यामध्ये काही कमी-अधिक झाले तर, हे लपुन बसलेले आजार, कसलीही पुर्व सुचना न देता उफाळुन येतात व आपणास व आपल्या प्रेमाच्या माणसांस नको असलेले अघटीत असे घडुन जाते.
कदाचित, योग्य वेळी मधुमेह असल्याचे निदान जरी झाले व आपण वैद्यकीय तज्ञाच्या सल्ल्याने औषधपाणी घ्यायला सुरुवात जरी केली तरी, आपले पुर्वग्रह दुषित मन मात्र आपल्याला अस्वस्थ करीत असतेच. माझ्या माहितीतील, मित्र परीवार (माझ्याच वयाचे म्हणजे ३६ वर्षे), नातेवाईकांमध्ये मधुमेह असलेले अनेक लोक मी बघतो. मधुमेहाच्या रुग्णाचे निम्म्यापेक्षा जास्त लक्ष त्याच्या खाण्याच्या वेळा पाळण्याकडे आणि खानपानातील पथ्ये पाळण्याकडे असते. आणि हे अगदी स्वाभाविक देखील आहे. पण सर्वंकष विचार करता आपणास हे समजेल की मधुमेह, माणसाचा काम करण्याचा फोकस, ऊर्जा निम्म्यापेक्षा जास्त कमी करतो. प्रकार दोन चा म्हणजेच प्रौढ मधुमेह होण्याचे वय देखील नेमके आपले नोकरी धंद्यात स्थिरस्थावर होतानाचे वय असते. या वयात, आपले लक्ष सर्वाधिक आपल्या करीयर वर असावयास हवे. पण दुर्दैव, एकदा का मधुमेहाचे निदान झाले की माणसाची कार्यक्षमता निम्म्याने कमी होते.
मित्रमंडळी नातेवाईक वर्गमित्र मैत्रिणी अशा सामाजिक एकत्रीकरणामध्ये, धार्मिक कार्य, लग्न समारंभ, आदी कार्यक्रमांमध्ये मधुमेहाच्या रुग्णाला सामाजिक संगतीचा मनसोक्त आनंद देखील घेता येत नाही. मी राजकीय क्षेत्रात काम करीत असतानाच, आमच्या राजकीय पक्षाचा, शेजारच्याच तालुक्यातील एक हरहुन्नरी तरुण नेता, माझा स्पर्धक होता. अतिशय धडाडीचा कार्यकर्ता. त्याच्या कामाचा उरक जबरदस्त होता. एखाद्या दौ-यासाठी बाहेर पडला की, मग त्याला कशाचीच फिकीर नसायची. लोकप्रिय, आणि चांगला वक्ता. मी स्वःतहुन राजकीय कारकीर्द सोडुन दिली कारण मला माझा मार्ग म्हणजे फिटनेस आणि त्याच्या मदतीने हजारो लोकांचे जीवन अंतर्बाह्य बदलण्याचे साधन, सापडला. . दोन वर्षापुर्वी मला असे समजले की, त्या शेजारच्या तालुक्यातील नेत्याने देखील राजकारण सोडुन दिले. कारण होते मधुमेह. म्हणजे एक चांगला वक्ता, समाजाविषयी कळवळा असलेला, समाजात सकारात्मक बदल व्हवे असे वाटणारा एक चांगला जन प्रतिनिधी मधुमेहामुळे जनतेने गमावला. दोन वर्षापुर्वी तो कंस्ट्रक्शन लाईन मध्ये काम करीत असल्याचे समजले होते. सध्या खबर नाही. असो.
मधुमेह नुसताच करीयरच्या आड येतो असे नाही तर छोट्या छोट्या गोष्टीतील आनंदापासुन मनुष्यास वंचित करतो. सततची चिंता. वेळा पाळण्याचे दडपण, एखाद्या अनोळखी ठिकाणी अपथ्ये खावयास लागु नये याची काळजी. मधुमेह म्हणजे चिंता, चोवीस तासातील जितके तास आपण जागे असतो, तितके तास फक्त चिंता. मधुमेह म्हणजे एकाच वेळी अनेक आजारांची खाण. मधुमेह म्हणजे करीयरचा उतरता आलेख. मधुमेह म्हणजे नको नको…
तर मग, या प्रकार दोनच्या मधुमेहाचा काही इलाज आहे की नाही? तर उत्तर एकच आहे. नाही, नाही नाही… मधुमेह झालेल्या माणसास, पुढचे सगळे आयुष्य मधुमेहासोबतच जगावे लागते. अद्याप तरी मधुमेहावर रामबाण इलाज वैद्यक शास्त्रामध्ये नाहीये. माझ्या पुढच्या लेखामध्ये, मी मधुमेह आणखी सुखकर कसा करता येईल, औषधे गोळ्या कमीत कमी कशा करता येतील या विषयी सविस्तर सांगेन.
याच्याही पुढची गंमत अशी आहे की, प्रकार दोनचा मधुमेह कुणाला होऊ शकतो हे नेमके पणाने सांगता येऊ शकत नाही. पहिल्या लेखामधील आजोबा वयाच्या साठीच्या पुढे असुन देखील, मधुमेहापासुन वाचले. तर त्यांचाच मुलगा वयाच्या ३५व्या वर्षी मधुमेही झाला. या दोन उदाहरणावरुन आपणास एक पुसटशी कल्पना येऊ शकते की, प्रकार दोनचा मधुमेह, हा आजार, जीवन्शैलीशी निगडीत आहे. पण आजच्या काळात आपण त्या आजोबांसारखी जीवनशैली जगु शकतो का? तर नाही. डोंगर द-या, शेत नदी नाले अंगमेहनतीची कामे. ह्यांना आता आपण पारखे झालो आहोत. समाज परीवर्तनच्या लाटेने आपल्याला एका अशा गर्तेमध्ये खेचले आहे की आपणास माहित आहे की सध्याच्या आपल्या जीवनशैलीमध्ये भरमसाट दोष आहेत. तरीही आपण ही जीवनशैली सोडु शकत नाही. धरल तर चावतय आणि सोडल तर पळतय, अशी काहीशी अवस्था आपली झालेली आहे. तरीदेखील, मधुमेहापासुन वाचणे काही अंशी आपल्या हाती आहे. मागील लेखात, लिहिल्या प्रमाणे, त्या गोष्टींची काळजी आपण घेतली तर मधुमेहापासुन आपण दुर राहण्याची शक्यता आहे. प्रकार दोनचा मधुमेह, भारतीयांना होण्याच्या मुख्य कारणांपैकी एक आहे, पोटावरील चरबी वाढणे. मधुमेह होऊ द्यायचा नसेल, तर, आपल्य पोटावर चरबी वाढु देऊ नका. तसेच जर आधीच पोटावरची चरबी वाढलेली असेल तर, मधुमेह झालेला नाही तोवरच, ती वाढलेली चरबी कमी करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करा.
कळावे,
निरामय जीवनासाठी निरंतर तुमचे सांगाती
महेश ठोंबरे – 9923062525
पल्लवी ठोंबरे – 9765702525
(टिप – लेखक व त्यांची पत्नी दोघेही वजन कमी करण्यामधील तज्ञ आहेत. निरामय, निरोगी आयुष जगण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा.)