Stay Fit Pune - The weight loss center

शरीरातील युध्दप्रसंग – कोण जिंकणार?

मागील लेखामध्ये आपण आपल्या शरीरामधील अफाट अशा अतिसुक्ष्म-जीवसृष्टीचा मागोवा घेतला. ब्रह्मांडातील आपण दृश्य-अदृश्य जीवसृष्टी इतकीच अफाट अशी सुक्ष्म-जीवसृष्टी आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये असते हे आपण पाहिले.

या सुक्ष्म-जीवसृष्टीमध्ये अब्जावधी सुक्ष्म-जिवाणु असतात. यातील काही आपल्या शरीरामधील चयापचयाच्या कार्यास अनुकूल असतात तर काही हानिकारक असतात. सदोदीत आपल्या शरीरामध्ये आपल्या नकळत या अनुकूल आणि प्रतिकूल अशा सुक्ष्म जीवांचे युध्दच सुरु असते. जसे या बाह्य जगतामध्ये चांगले विरुध्द वाईटाचे निरंतर युध्द सुरु आहे अगदी त्याच प्रमाणे आपल्या शरीरामध्ये देखील असेच युध्द सुरु असते. जेव्हा कधी प्रतिकूल जिवाणुंची संख्या वाढते त्या त्या वेळी आपण आजारी पडत असतो. आणि हे युध्द मुख्यत्वे करुन सुरु असते आपल्या आतंड्यांमध्ये. यालाच वैद्यकिय भाषेत आतड्यांचे आरोग्य किंवा संतुलन म्हणतात. हे संतुलन बिघडले की आपण आजारी पडणार. आणि होणारे आजार मुख्यत्वे करुन आपली एकंदरीत प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळेच होत असतात. याचाच अर्थ असा की आतड्यांच्या आरोग्यावर किंवा संतुलनावरच अवलंबुन आहे आपली रोग-प्रतिकारक शक्ति. त्यामुळे आपली रोग प्रतिकारक शक्ति जर आपणास अबाधित ठेवायची असेल तर अगदी ठरवुन आपण आपल्या आतड्यांचे म्हणजेच पोटाचे आरोग्य काटेकाळजीने सांभाळले पाहिजे.  व हे पोटाचे आरोग्य सांभाळण्यासाठी आपणास आपल्या पोटातील अनुकूल जिवाणुंची संख्या नेहमी प्रतिकूल जिवांणुपेक्षा जास्त ठेवावी लागेल.

सर्व प्रथम आपण हे पाहुयात की प्रतिकूल जिवाणुंची संख्या वाढण्याची कारणे काय असु शकतात?

 • धकाधकीची जीवनशैली
 • जबरदस्त ताण-तणाव
 • कमी झोप
 • प्रक्रिया केलेले तसेच फास्ट फुड
 • खुप जास्त प्रमाणात साखर असलेले अन्नपदार्थ
 • आणि आजारपणात औषध म्हणुन घेतलेली प्रतिजैविके. प्रतिजैविके म्हणजे ॲटीबायोटीक्स. ही प्रतिजैविके आपल्या पोटातील प्रतिकूल जिवाणुंस संपवण्याच्या कामात असतानाच, अनुकूल जिवाणुंसदेखील मारुन टाकतात.
 • अति मद्यपान, धुम्रपान
 • आहारामध्ये वैविध्य नसणे
 • व्यायाम किंवा शारिरीक कष्टाचा अभाव.
 • स्त्रियांमध्ये गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन

आता आपण समजुन घेण्याचा प्रयत्न करुयात की आपल्या पोटाचे आरोग्य बिघडले तर त्याची आपल्या आरोग्यावर कोणती लक्षणे दिसतात.

 • अजीर्ण होणे. मराठी मध्ये एक सामान्य म्हण आहे बघा! खाल्लेल अंगी न लागणे. खाल्लेलं अंगी लागत नसेल तर ते यामुळेच. पचनसंस्थेमध्ये बिघाड, वारंवार जुलाब होणे, इत्यादी लक्षणे.
 • आपल्या शरीराच्या वजनामध्ये अनपेक्षित व अचानक बदल होणे
 • अनिद्रा व कायमचा थकवा
 • खाज येणारे त्वचारोग
 • हवामानातील छोट्याशा बदलाने थंडी ताप खोकला इ सारखे आजार वारंवार होणे
 • बरीच वर्षे जर अशाच पध्दतीने पोटाचे आरोग्य म्हणजेच आपल्या आतड्यांमधील सुक्ष्म जीवसृष्टीचे संतुलन बिघडलेले असेल तर यातुन पुढे कर्करोग होण्याचा धोका देखील उदभवु शकतो.

वरील पैकी एखादे जरी लक्षण तुम्हाला तुमच्या आरोग्यामध्ये दिसले तर हमखास समजा की तुमच्या पोटाचे आरोग्य बिघडलेले आहे. मग आता प्रश्न पडला पाहिजे की आपल्या पोटाचे आरोग्य बिघडु द्यायचे नसेल किंवा बिघडलेले पोटाचे आरोग्य पुन्हा दुरुस्त कसे करायचे.

 • ताण-तणाव कमी करा. काही अगदी जुन्या पुराण्या समस्यांनी आपल्या मन आणि मेंदुमध्ये कायमचे घर केलेले असते. या समस्या सोडवताना किंवा त्यांचे निर्वाहन करताना त्या नुसत्या मन व मेंदु वरच परिणाम करतात असे नाही, तर त्यांचे दुष्परिणाम आपल्या पोटाच्या आरोग्यावर देखील होत असतात. या पासुन असलेला धोका कमी करण्यासाठी ध्यान, नामजप, चालणे, मसाज करुन घेणे, योगा, हास्य उपचार असे उपाय करु शकता.
 • पुरेशी झोप होऊद्या. दररोज किमान ७ ते ८ तासाची झोप आपणास आवश्यक असते
 • अन्न चावुन आणि सावकाश खाणे. ३२ वेळा घास चावणे.
 • भरपुर पाणी पिणे
 • अनुजैविके म्हणजेच प्रोबायोटीक्स चा वापर आपल्या आहारामध्ये करणे.
 • आहारामध्ये बदल – सर्वांग पुर्ण आहार सोबतच प्रक्रिया केलेले व खुप जास्त साखर जास्त असलेले पदार्थ आहारातुन टाळणे.

या लेखामध्ये आपण, पोटाचे आरोग्य बिघडण्याचे कारणे काय असु शकतात हे पाहिले, नंतर असे पोटाचे आरोग्य बिघडले तर त्याची लक्षणे आपल्या आरोग्याच्या स्थितीमध्ये कोणती असतात हे आपण पाहीले. व त्यानंतर आपल्या पोटाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी, म्हणजेच आपल्या आतड्यांमधील अनुकूल व प्रतिकूल जिवाणुंचा समतोल राखण्यासाठी आपण आपल्या दिनचर्येत, जीवनात काय बदल केले पाहीजे हे पाहिले.शरीरातील या नित्याच्या युध्द प्रसंगामध्ये जिंकतो सुध्दा कधी अनुकूल जिवाणु जिंकतात तर कधी प्रतिकूल जिवाणु जिंकतात. प्रतिकूल जिवाणु जरी जिंकले तरी हरतो मात्र आपणच, हे लक्षात असुद्या.

त्यामुळे आपणच ठरवायचे, आपणास जिंकायचे की हरायचे? आणि हरायचे नसेल तर आपण अनुकुल जिवाणुंना म्हणजे अनुजैविकांना पोषक असे जीवन जगण्यासाठी आपल्या आहार व विहारामध्ये योग्य तो बदल (वर सांगितल्या प्रमाणे) त्वरीत केले पाहिजे.

या लेख मालेतील शेवटच्या लेखामध्ये अवश्य वाचा, अनुजैविके म्हणजेच प्रोबायोटीक्स चा उपयोग जठरातील सुक्ष्म-जीवसृष्टीचे संतुलन राखण्यासाठी कसा केला जाऊ शकतो. अनुजैविके म्हणजे काय, ही अनुजैविके आपणास कोणत्या अन्नपदार्थांमधुन मिळु शकतात हे आपण पुढच्या लेखामध्ये सविस्तर वाचुयात.

आमचे लेख आपणास कसे वाटले, हे अवश्य कळवा. तुमच्या मित्र परिवारासोबत हे लेख अवश्य शेयर करा.

कळावे

निरोगी आयुष्याचे तुमचे सांगाती

महेश व पल्लवी ठोंबरे

9923062525

Facebook Comments

ADD COMMENT

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.