
स्त्रीचे सौंदर्य म्हणजे काय?
इंग्रजीमध्ये एक खुपच प्रसिध्द म्हण आहे. Beauty lies in the eyes of beholder. वर करणी ही म्हण खुप साधी सोपी वाटते पण या म्हणीमुळे दिशाभुल अनेकांची झालेली आहे. त्यातल्या त्यात आजच्या व्यग्र काळातील स्त्री ची तर खुपच जास्त. श्रीदेवीच्या दुर्दैवी मृत्युनंतर महेशच्या एका लेखामध्ये, त्याने सुंदर दिसणे आणि सुंदर असणे या विषयावर खुपच छान माहीती दिली आहे. मी जेव्हा तो लेख वाचला त्यावेळी, एक स्त्री म्हणुन मला काही बोलावेसे वाटले होते, पण्ण वेळे अभावी ते तेव्हा ते जमले नव्हते.

सलमा हायेक, एक यशस्वी हॉलीवुड अदाकारा सुंदरतेविषयी काय म्हणते?
महेशचा तो लेख खरच खुप चांगला आणि डोळ्यात अंजन घालणारा आहे. आजकाल आम्ही आधुनिक स्त्रिया, मग त्या नोकरी व्यवसाय करणा-या असो किंवा गृहीणी असोत, आम्ही फक्त आणि फक्त सुंदर दिसण्यासाठीच प्रयत्न करीत असतो. सुंदर दिसणे हा प्रत्येक स्त्रीचा नुसता अधिकासच नाही तर मुळातच प्रत्येक स्त्री सुंदर असतेच. तिचे सौंदर्य तिच्या सुंदर असण्यामध्ये आहे. आणि जेव्हा स्त्रीला आपल्या मुळ सुंदर असण्याचा विसर पडतो, तेव्हाच तिला सुंदर दिसण्यासाठी नाना प्रकारे प्रयत्न करावे लागतात.
स्त्रीला स्वःतच्या मुळातच सुंदर असण्याचा विसर कसा काय पडतो? आपल्या अंगभुत सौंदर्याचा विसर पडल्यावर नक्की काय होते? आपल्या शरीर आणि मनावर या विसरण्याचा काय परीणाम होत असतो? यावर उपाय काय? हे सगळे आपण पाहुयाच. पण त्यापुर्वी स्त्रीचे सौंदर्य म्हणजे नक्की काय? याविषयी थोडे जास्त खोलात जाऊन माहीती करुन घेण्याचा प्रयत्न करुयात.
इंग्रजी म्हण तस पाहता फसवी आहे. त्या म्हणीचा अर्थ काय आहे ते पाहु आधी. जो पाहणारा असतो त्याच्या डोळ्यात सौंदर्य असले तरच तो जे काही पाहतो आहे ती वस्तु किंवा स्त्री त्याला सुंदर दिसते. अर्थात संस्कार किंवा दृष्टीकोनाचा भाग सोडला तर, ही म्हण फसवी आणि दिशाभुल करणारी आहे. आपण सुंदर आहोत की नाही याचा निर्णय आपल्याला जो कोणी पाहत आहे तो कसा काय करु शकतो? माझ्या सुंदर दिसण्या व असण्याचा अधिकार माझा आहे. व मी सुंदर आहे की नाही हे ठरविण्याचा अधिकार देखील माझाच म्हणजे स्त्रीचा आहे. तर कुणीही माझ्या विषयी सकारात्मक किंवा नकारात्मक, माझ्या संमतीशिवाय किंवा मर्जीशिवाय बनवुच कसे शकेल? आधीच मी म्हंटले आहे. प्रत्येक स्त्री मुळातच सुंदर आहे. ती ईश्वराची एक अतुलनीय, अनाकलनीय अशी कलाकृती आहे. ही ईश्वराने बनवलेली कलाकृती सुंदरच असली पाहीजे, नव्हे सुंदर आहेच. एक स्त्री जास्त सुंदर आणि दुसरी कमी सुंदर हा भेद केवळ , मुळ सौंदर्याचा विसर पडल्यामुळेच आलेला आहे. जिच्या अंगी या विश्वाला जन्म देण्याची क्षमता आहे, जिच्या मुळे पिढ्या न पिढ्या सुसंस्कारीत आणि सशक्त होतात, ती स्त्री सुंदर नाही असे कसे काय असु शकते. ती, म्हणजेच जगातील प्रत्येक स्त्री सुंदरच आहे.

एका चित्रकाराने चितारलेले लक्ष्मी मातेचे चित्र
साधारण पणे कोणत्याही स्त्रीच्या स्त्रीत्वाचा पुर्ण आविष्कार होतो तो ती स्त्री आई झाल्यानंतरच. आई होणे म्हणजे स्त्रीत्वाच्या चरम सीमेचा आनंद घेणे, पुर्ण स्त्री होणे. स्त्रीत्वाचा अत्युच्च आविष्कार म्हणजे तिने आई होणे. आई झाल्यानंतर स्त्री शारीरीक आणि भावनिक पातळीवर पुर्ण झालेली असते. हे पुर्णत्व प्राप्त करुन घेताना शारीरीक आणि भावनिक पातळ्यांवर अनेक स्थित्यंतरांना तिला सामोरे जावे लागते. यातुन प्रसुती वेदना सहन करुनच मग तिला पुर्णत्व प्राप्त होत असते. आणि त्यानंतरच ख-या अर्थाने ती सौंदर्याच्या बाबतीत देखील अत्युच्च सीमेवर गेलेली असते. गरोदर पणामुळे शरीरामध्ये खुप सारे बदल झालेले असतात. त्या सगळ्या बदलांना सामावुन घेत, पुन्हा स्त्री सुंदर होत असते.
स्त्रीचे सौंदर्य कशात आहे? ती सुंदर आहे म्हणजे नक्की काय? सुंदर असण्यासाठी नक्की काय , कसे असावे?
युगानुयुगे, स्त्री सौंदर्याविषयी अनेक साहित्य, पुस्तके, ग्रंथ, कविता, गझले, असे जवळजवळ सगळ्याच संस्कृत्यांमध्ये आपणास पहायला मिळते. जुन्या मराठी चित्रपटांमध्ये तर स्त्रीच्या सौंदर्याचे जणु पोवाडेच ऐकावयास मिळतात. लटपट लटपट तुझे चालणे, आली ठुमकत मान मुरडत हिरव्या रानी, एक लाजरा न साजरा मुखडा, इत्यादी गाण्यांमधुन स्त्रीच्या सुंदरतेला शब्दात साठवण्याचा प्रयत्न केला आहे. नुसते चित्रपट संगीतच नाही तर, विविध कविता, कादंब-या, कथा यामधुन देखील स्त्रीच्या सुंदरतेला साकारलेल आहेच. पण केवळ अशा ग्लॅमरस सुंदर दिसण्यापेक्षा, नक्की सुंदर असणे स्त्रीला जमु शकेल का? सुंदर असण्याचे काही निकष आहेत का? असतील तर ते कोणते?
नुसताच चेहरा सुंदर असुन चालणार नाही तर निरामय, निरोगी शरीरयष्टी शिवाय कोणतीही स्त्री सुंदर असुच शकत नाही. सिंह कटी म्हणजे बारीक कंबर, सुरईदार मान, गोलाकार मनगटे, लांबसडक बोटे, सुडौल जांघे, ही वरकरणी दिसणारी सुंदर स्त्रीची लक्षणे. आपल्याकडे स्त्रीच्या सौंदर्याच्या बाबतीत असे मानले जायचे की, तिचे शरीर कमनीय आणि पुष्ट असावे, त्याच वेळी ती चपळ देखील असावी. म्हणुनच की काय भारतामध्ये जी प्राचीन स्त्री शिल्पे आहेत त्यातील स्त्री अशीच भरदार, तरीही चंचला दिसते. माझ्या सहीत आपण सर्व स्त्रियांनी याबाबतीत जागरुक होणे खुप गरजेचे आहे. अंगावर किती तोळे दागिन्याचा साज चढविल्यावर आपण श्रीमंत दिसु पण सुंदर दिसण्यासाठी वर सांगितल्याप्रमाणे आपले एकुण शरीरच सुंदर असणे व नसेल तसे बनवणे, हे आपले लक्ष्य पाहिजे.

प्राचीन शिल्पकलेमधील सुंदर स्त्री
आणि प्रत्येक स्त्री अशीच असते. किंवा असावयास हवी. पण कुठे तरी काहीतरी बिघडते, आणि आपल्याला आपल्या अंगभुत सौंदर्याचा विसर पडतो.
मैत्रिणींनो, आपण स्त्री म्हणुन जन्माला आलो तेव्हाच सुंदरतेचे प्रमाणपत्र आपल्या मिळाले आहे. आता आवश्यकता आहे , आपल्यातील मुळ सौंदर्याला पुन्हा प्रस्थापित करण्याची.