Stay Fit Pune - The weight loss center

जरा विसावु या वळणावर…

बघता बघता आणखी एक वर्ष सरले. आमच्या सहजीवनाला २३ एप्रिल या दिवशी बरोब्बर ११ वर्षे पुर्ण झाली. प्रत्येकाच्याच आयुष्यात अशी काही वळणे येत असतात की जिथे थोडा वेळ थांबुन जर मागे पाहिले तर आपणास आपल्या आयुष्यातील, भुतकाळातील आठवणी, जीवनप्रवास, संघर्ष अशा सर्वांकडे पाहुन क्षणभर का होईना स्वःतच स्वःत कडे पाहुन स्मित हास्य करावेसे वाटते.

नुकताच साज-या केलेल्या आमच्या लग्नाच्या वाढदिवसाने मला पुन्हा एकदा मागे वळुन बघण्याची संधी दिली. मला पल्लवी च्या साथीने, एकमेकांच्या सोबतीत घालविलेले, घालवित असलेले सगळे कटु-गोड प्रसंग आठवतात. माझ्या करीयरची सुरुवातीची वर्षे म्हणजे लग्नाच्या पुर्वीचा काळ मी व्यवसाय, समाजकारण आणि समाजकारणातुन राजकारण करण्यात घालवला. अगदी माझे शिक्षण सुरु असतानाच मी उत्पनाच्या विविध संधी शोधुन त्यातुन नवनवीन उद्योग केले व त्यात यशस्वी देखील झालो. मला कौटुंबिक राजकीय वारसा जरी लाभलेला असला तरी मी क्वचितच त्या कुबड्यांचा आधार घेतला माझ्या सामाजिक जीवनामध्ये. किंबहुना माझे चुलते, ज्यांना आम्ही भाऊ म्हणतो त्यांची देखील अशीच शिकवण नेहमी असायची, आहे की स्वःतचे विश्व स्वःत निर्माण करा.

२३ एप्रिल २००८ ला माझे लग्न झाले. लक्ष्मीच्या पावलांनी पल्लवीने माझ्या जीवनामध्ये प्रवेश केला. माझ्यामध्ये किती पोटेंशियल आहे हे माझ्या आयुष्यात फार कमी लोकांना समजले होते. पल्लवी ने खुपच कमी काळामध्ये मला ओळखले. ती जरी शिकलेली असली तरी पारंपारिकता तिला भारी आवडते. त्यामुळे एक प्रकारे घर-कुटुंब, पाहुणे-राऊळे असे सगळे करण्यामध्ये तिचा काळ जाऊ लागला. विशेष म्हणजे शहरात राहिलेली, वाढलेली पल्लवी माझ्या गावी अगदी दुधात साखर मिसळावी तशी मिसळुन गेली.

 

कालांतराने माझा मुळशी तालुक्यात जनसंपर्क वाढला. ज्या राजकीय पक्षाचे काम मी करायचो त्या पक्षातील वरिष्टांनी देखील माझ्या कामाची दखल घेत मला पक्ष संघटनेमध्ये जबाबदारीची कामे सोपविली. एक वेळ अशी आली की समाजातील लोकांच्या माझ्या कडुन अपेक्षा खुपच वाढल्या. आणि हे साहजिकच होते. त्यामुळे मी निवडणुक लढवुन समाजासाठी आणखी ठोस व भरीव असे काम करण्याचे ठरवले.. पक्षसंघटना व वरिष्टांकडुन देखील माझ्या या इच्छेला दुजोरा मिळाला व मी अधिक जोमाने कामाला लागलो. घरसंपर्क, शासकिय योजनांविषयी माहिती लोकांना देणे, लाभ मिळवुन देणे, तालुक्यातील लग्नकार्ये, विधी अशा सर्वच सामाजिक कार्यक्रमांमध्ये माझी उपस्थिती वाढु लागली. व लोकांकडुन देखील माझ्या एकंदरीत कामाचे व प्रयत्नांचे कौतुक होऊ लागले.

अशातच एक अनपेक्षित बातमी आमच्या कानी आली. पक्ष संघटनेने मला उमेदवारी देण्याचे नाकारले. प्रश्न मोठा गंभीर होता. प्रचंड ताण-तणावाला मी सामोरा जात होतो. काहीही करुन मला निवडणुक लढवायचीच होती. मग मी मार्ग निवडला अपक्ष म्हणुन लढण्याचा. अर्ज दाखल केला, प्रचाराला जोरात सुरुवात झाली. मी केलेल्या कामाची पावती मला मिळत होती. लोक मला पाठिंबा देत होते. प्रचंड उत्साहात मी आणि माझे सर्व सहकारी घरोघर संपर्क करीत होतो. निवडणुकीचा दिवस उजाडला. माझ्या मतदार संघामध्ये अपेक्षित पणे सर्व गावांमधुन मतदान झाले. तरीही निकालाची आतुरतेने वाट पाहत होतो आम्ही. निकाल लागला. महेश ठोंबरे चा १८० मतांनी पराभव झाला.

हो माझा पराभव झाला.

आयुष्याच्या त्या उमेदीच्या दिवसांमध्ये, जेव्हा मी माझ्या कारकिर्दीला सुरुवात केली तेव्हाच मला पराभवाला सामोरे जावे लागले. निकाला नंतरचे काही दिवस नव्हे काही महिने मी अक्षरशः एका विशिष्ट गर्तेमध्ये फिरत होतो. व्यवसाय-धंदा आधीच बंद केले होते. करण्यासारखे काहीही नव्हते असे वाटु लागले. लोकांनी मला नाकारले अशी भावना मनात घर करुन राहिली. आणि ती भावना मला काहीही करु देत नव्हती. मी रिकामटेकडा झालो. पराभवाच्या ग्रहणाने मी पुरता ग्रासलो. नैराश्य, वैफल्य, एकटेपणा, नाउमेद अशा अनेक गोष्टींनी माझ्या भावविश्वावर ताबा मिळविला. आर्थिक स्थिती देखील बिघडली. उत्पन्नाचे मार्ग बंद झाले. माझ्या मधील कर्तृत्व संपले आहे, मी काहीही करु शकणार नाही अशा नैराश्याच्या गर्तेमध्ये मी गुंतुन होतो.  आणि त्याचा परिणाम माझ्या आरोग्यावर झाला. माझे वजन काहिच्या काही वाढले. वयाच्या तिसाव्या वर्षी मी पन्नाशीचा दिसायला लागलो. या सर्वांमुळे मी एकलकोंडा झालो. त्या कालावधीत मी जाणीवपुर्वक कुणालाही भेटण्याचे टाळु लागलो.

अशा वेळी माझ्या घरातील थोरांच्या मार्गदर्शनासोबतच पल्लवीने ज्या प्रकारे मला झेलले ते खरे म्हणजे मला अंतर्मुख करणारे होते. मी अंतर्मुख झालो, विचार करु लागलो.

त्याच वर्षी आमच्या लग्नाच्या वाढदिवसाचा फोटो

कुणालाही आयुष्यात काय हवे असते? सुख! बरोबर ना?

पण प्रत्येक व्यक्तिच्या सुखाच्या व्याख्या वेगवेगळ्या असतात. त्या बदलत राहतात. कधी कधी एकाच व्यक्तिच्या सुखाच्या व्याख्या, वेगवेगळ्या काळात बदलु शकतात, नव्हे बदलल्याच पाहिजे. पण सुख मिळविण्याची अभिलाषा मात्र सर्वांची सारखीच असते. प्रत्येकालाच सुख हवे आहे. आयुष्यात जस जसे आपण मार्गक्रमण करीत असतो तसतसे आपण वेगवेगळ्या वळणांवर येतो. कधी कधी त्या वळणांवरुन आपण मागे वळुन पाहतो. आणि जेव्हा आपल्याला नैराश्याने ग्रासलेले असते अशा वेळी जेव्हा आपण एखद्या वळणावर येतो तेव्हा आपणास या नैराश्याचा तिटकारा येतो. हे नैराश्य चांगले की वाईट, योग्य की अयोग्य असे आपण याचे वर्गीकरण करण्यास सुरुवात. पण असे केल्याने काय हाशील होणार बरे?

नेमके हेच मला पल्लवीच्या साथीने समजले. नैराश्य, उदासिनता हे सगळे आपल्या आयुष्यातील वेगेवेगळ्या वळणांवरील थांबे आहेत, विसावे आहेत. मी ज्या वळणावर होतो ते वळण म्हणजे सुध्दा एक विसावाचे वळण आहे याची मला मात्र जाणीव नव्हती. साथीदार असतोच यासाठी. तुमच्या सुख दुःखात खंबीर पणे तुमच्या पाठीशी उभे राहणारा तुमचा साथीदार तुमचे सर्वस्व असतो. नैराश्य अंधारातुन अंधारात घेऊन जातेच. पण योग्य संगत तुम्हाला मिळाली असेल तर हेच नैराश्य तुम्हाला नव्या उमेदीने जगण्याची संधी देऊ शकते, नव्हे देतेच.

फिनिक्स पक्ष्याविषयी तुम्हाला माहित आहे ना! हा पक्षी जेव्हा मरतो तेव्हा तो स्वःतच जळुन जातो. व त्या जळण्यातुन जी राख तयार होते त्या राखेतुन हा पक्षी पुन्हा नव्याने जन्म घेतो व पुनः आकाशात ऊंच भरारी घेतो.

माझ्या बाबतीत देखील असेच झाले. स्वःतचे वजन कमी करण्यासाठी म्हणुन मी आमचे पुण्यातील शेजारी चौबळ यांचे मार्गदर्शन घ्यायला सुरुवात केली. अगदी थोड्याच काळात माझे शरीराचे वजन तर कमी झालेच पण माझ्या मनावर असलेले दडपण देखील कमी होऊ लागले.

माझ्यामध्ये फिटनेस क्षेत्राविषयी कुतुहल निर्माण झाले. माझ्या सारख्या निराशेच्या गर्तेमध्ये अडकलेल्या माणसाला त्यातुन सही सलामत बाहेर काढण्याचे काम, फिटनेस ने केले. धड चालता येत नसलेला मी, काही महिन्यांमध्येच चक्क २१ किमी मॅरेथॉन मध्ये भाग घेऊन यशस्वीपणे पुर्ण देखील केली.

फिटनेस या एका क्षेत्राने मला काही महिन्यांतच एक नवा आत्मविश्वास दिला. जगण्याची नवी उमेद दिली. माझ्या सोबतच पल्लवीने देखील फिटनेस कडे गांभीर्याने पाहण्यास सुरुवात केली. आम्ही दोघांनीही वजन कमी केले. नवीन उत्साह आमच्या नात्यामध्ये प्रवाहीत झाला.

 

आर्थिक विवंचना अजुन ही होत्याच. काहीतरी व्यवसाय सुरु करण्याचा मानस होता. पण माझ्यातील समाजकारणी महेश अजुन ही जिवंत होताच. त्यामुळे आपल्याकडून नेहमीच समाजाच्या भल्यासाठी काहीनाकाही झाले पाहिजे, लोकांच्या आयुष्यात बदल करण्यात आपण काहीतरी ठोस योगदान करु शकलो पाहिजे अशी अंतरीची इच्छा अजुनही अंतरात होतीच.

मग का नाही आपण स्वःतच फिटनेस कोच म्हणुन काम करावे, असा विचार पल्लवीने बोलुन दाखवला. आणि क्षणार्धातच मलाही तो विचार मनापासुन पटला. मागील काही महिन्यांमधील नैराश्य व उदासिनता मला आठवली. एकलकोंडेपणा आठवला. पराभव आठवला. लोकांनी नाकारलेले मला आठवले. एकंदरी मला माझ्या आयुष्यातील ते वळण आठवले ज्या वळणावर मी मलाच हरवुन बसलो होतो. आणि लागलीच मी पल्लवीच्या प्रस्तावास होकार दिला.

मग काय, प्रशिक्षण, ईंटर्नशिप, फिल्ड वर्क असे सगळे सुरु झाले. सुरुवातीच्या काळात या व्यवसयात देखील मला अपयश पहावे लागले. पण आता निराश होण्यासाठी संधी नव्हतीच मुळी कारण मागील वर्षीचे नैराश्यानेच आम्हाला शिकविले होते की नैराश्य, अपयश याकडे आपण संधी म्हणुन पाहिले पाहिजे. पुणे शहरात कोथरुड येथे आम्ही आमचा फिटनेस क्लब सुरु केला. अल्पावधीतच कोथरुड मध्ये आम्ही खुपच चांगला व्यवसाय करु लागलो. या व्यवसायामध्ये एक गंमत आहे ती अशी की, यात यश व पैसा कमाविण्याला कसलीही मर्यादा नाही. हळु हळु माझी स्वःतची ऑरगनायझेशन तयार झाली. एका फिटनेस क्लब मधुन दुसरा सुरु झाला, तिसरा सुरु झाला. आज पुर्ण महाराष्ट्रामध्ये माझ्या ऑर्गनायझेशन च्या अंतर्गत ४० फिटनेस क्लब आहेत. १०० च्या आसपास टीममेंबर्स आज माझ्या सोबत जोडले गेले आहेत.

आमची पहिली आंतरराष्ट्रीय सहल – २०१४

आज सहा वर्षे होऊन गेली मी या व्यवसायामध्ये दररोज पुढचे पाऊल टाकीत आहे. कंपनीमार्फत प्रशिक्षणासाठी अनेक वेळा मला परदेशात जाण्याची संधी मिळाली. ॲस्ट्रेलिया, बॅंकॉक, मकाऊ,बाली अशा ठिकाणी पंचतारांकित हॉटेलांमध्ये प्रशिक्षण घेण्याची संधी मला मिळाली. कामातील सातत्य व आर्थिक स्वातंत्र्य यामुळे अनेकवेळा सिंगापुर, हॉन्गकॉन्ग, बाली, बॅंकॉक, आबुदाबी अशा ठिकाणी सहकुटुंब सह परिवार सुट्ट्यांचा आनंद घेण्याची संधी देखील मला मिळाली. अशा संधी फक्त मलाच मिळतात असे नाही. माझ्या टीममधील अनेकांना अशा संधी मिळाल्या आहेत.

एका तालुक्यात, विशिष्ट लोकांसोबत राहिल्याने संकुचित झालेला माझा  जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन अंतर्बाह्य बदलला. ट्रेनिंग्जचा माध्यमातुन व्यक्तिमत्वामध्ये आमुलाग्र बदल झाला. उत्पन्न वाढुन सहा आकड्यांमध्ये गेल्याने जीवनशैली उच्च झाली. आणि आता मला स्काय इज द लिमिट या म्हणीचा खराखुरा अर्थ समजला आहे असे वाटु लागले आहे. कष्ट करुन मिळालेल्या पैशाला खुपच जास्त किंमत असते. आणि त्यातच तो पैसा “खुप” असेल तर? तर आकाशच ठेंगणे होऊन जाते. आर्थिक सुरक्षेची चिंता करणारा मी, कधी आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र झालो माझे मलाच कळले नाही. भरपुर पैसा मी कमावला व अजुन ही कमावित आहे. सोबतच पैशातुन पैसा तयार होईल अशा योग्य साधनांमध्ये खुप मोठ्या प्रमाणात गुंतवणुक देखील झाली आहे. माझ्या कमाईतुन मी स्वतचे दोन फिटनेस क्लब उभे केले. चारचाकी गाडी घेतली, पुढील काळात नवीन घर देखील घेतोय.

पल्लवी जी आधी पारंपारिकतेची आवड असणारी होती, ती देखील माझ्या सोबत माझ्या खांद्याला खांदा लावुन व्यवसायात उतरली. तिच्यामध्ये महत्वकांक्षा जाग्या झाल्या. काहीतरी मिळविण्याचे स्वप्न ती देखील पाहु लागली व आज ती स्वतंत्र पणे, माझ्या अनुपस्थितीमध्ये सुध्दा सगळा कारभार नीट पार पाडते.

हि तीच पल्लवी आहे जिने मला त्या वळणावर साथ दिली आणि आजही देत आहे.

अशी वळणे आपल्या सर्वांच्याच आयुष्यात येतात. या वळणांवर थोडासा विसावा घ्यायचा असतो. आत्मचिंतन करायचे असते. व नव्या उभारीने आयुष्याच्या, जीवनाच्या मार्गावर पुढे पुढे चालत रहायचे असते. कारण आम्हाला हे समजले आहे की आमचा वर्तमान काळ जसा भन्नाट आहे तसाच आमचा भविष्यकाळ देखील जोरदार असेल. नुकत्याच झालेल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज पुन्हा मागे वळुन पाहता आले. माझ्या जीवनात सदोदीत माझ्या सोबत असणा-या माझ्या लाईफ पार्टनर पल्लवी व मी, आम्ही  दोघांनी लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नवीन संकल्प केला आहे. व तो म्हणजे –

स्काय इज द लिमिट!

आमच्या सगळ्या सहली, ट्रेनिंगचे फोटो अवश्य पहा, आवडतील तुम्हाला

previous arrow
next arrow
Slider

Facebook Comments

ADD COMMENT

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.