जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने..

जागतिक महीला दिवस

युरोप अमेरिका आणि इतर प्रगत देशांतील स्त्रिया आणि त्यांच्या समस्या भारतातील स्त्रिया आणि भारतातील स्त्रियांच्या समस्या यात जमीन अस्मानचा फरक आहे. आम्हाला कुणी म्हणु जाईल की तु फक्त आणि फक्त स्त्री म्हणुन जग. तर हे खरच शक्य आहे का हो? मला सांगा, आपल्याकडे स्त्री ही नुसती स्त्री कधीच नसते. ती मुलगी, बहीण, पत्नी , माता अशा वेगवेगळ्या भुमिकांमध्ये अडकलेली आहे. आणि तिच हे अडकणे खरच अडकणे आहे का? की ह्या सगळ्या भुमिका तिच्या स्त्री असण्याला आणखी उंची मिळवुन देतात? शहरी स्त्रियांच्या समस्या नक्की काय आहेत? करीयर, कुटुंब, स्वःतची वेगळी सामाजिक ओळख टिकवुन ठेवणे, या सगळ्या मध्ये शहरी स्त्री ने स्वःतसाठी आणखी नवीन काही समस्या निर्माण केल्या आहेत का?

एक कॉल

आम्हा भारतीयांना कदाचित महीला दिवस साजरा करायला वेळ मिळणे जरा कठीणच दिसतय. सर्वच्या सर्व भारतीय सोडा पण महिलांना तरी त्यांचे स्त्री असणे साजरे करायला वेळ मिळेल की नाही ठाऊक नाही. माझी एक मैत्रीण आहे. तिचे नाव वैदेही. ती अंदाजे ३६ वर्षाची असेल. काल तिला मी फोन केला आणि महिला दिनानिमित्त काही आगळे वेगळे करायचे अशी विचारणा केली. त्यावर ती जे बोलली ते मला आश्चर्यचकीत करणारे होते. ती म्हणाली अग कसला आलाय महीला दिवस! आपल्या साठी आलेला प्रत्येक दिवस सारखाच आणि तितकाच जिकीरीचा असतो. उलट महिला दिवसाचे नियोजन करण्यासाठी मागच्या पुढच्या दिवसांमध्ये , टाईमटेबल मध्ये लोचा करावा लागेल. त्यामुळे रोजचीच लढाई आणखीच अवघड होऊन जाईल. अगदी छोटा कार्यक्रम जरी करायचा म्हंटला तरी वेळ तर द्यावा लागेल आणि आजकाल वेळ काढणेच कठीण होऊन बसले आहे.

ती पुढे हे देखील म्हणाली की अग इथ मला स्वतची काळजी घ्यायला देखील वेळ मिळत नाही तर अशा कार्यक्रमांना वेळ काढणे अशक्य आहे.

तिच्या या बोलण्याने, भारतातील विशेषतः शहरातील, करीयरीस्टीक, स्त्रियांच्या समस्या किती गंभीर आहेत याचा अंदाज आला. तिचे बोलण म्हणजे हिमनगाचा वरचा भाग होता.

पाश्चात्य आणि भारतीय स्त्री मधील मुलभुत फरक

भारताच्या शहरी भागातील स्त्रिया आणि ग्रामीण भागातील स्त्रिया यांच्या मध्ये वरकरणी फरक दिसत असला तरी मुलतः त्या दोघी देखील एका विशिष्ट धाटणीतुनच घडत आहेत. त्यांच्या समस्या, वेदना भिन्न असल्या तरी त्यांचे मुळ एकच आहे. हे मुळ आहे जबाबदारीची जाणीव. कित्येकदा आपण ऐकतो, परदेशामध्ये आई वडील मुलांना १२ वी पर्यंतच शिक्षण देतात आणि मग ते मुलांना अक्षरक्षः सोडुन देतात. एक माता, तिथुन पुढे तिच्या मातृत्वामधुन मुक्त झालेली असते. तिला त्या मुलांच्या जडण घडणी, आर्थिक सामाजिक प्रगतीशी फारसे देणे घेणे नसते. तसेच, इतर नाती गोती देखील परदेशात नावापुरतीच असतात. कुणाच्या घरी जायचे असेल तर अपॉइंटमेंट शिवाय गेलात तर घरात असुन देखील तिथे नातेवाईकांना सुध्दा घरात प्रवेश दिला जात नाही. आणि असा प्रवेश दिला जात नाही म्हणुन सासु सासरे नणंदा भावजाया रुसुन बसत नाहीत. पाश्चात्य स्त्रियांनी लग्नांनंतर फक्त पत्नी म्हणुन एकच जबाबदारी स्वीकारलेली असते , आणि त्यातही नवरा बायको, दोघांनाही घरातील कामाची समान विभागणी करण्याचा पायंडा कित्येक शतकांचा आहे. स्त्री पुरुष समानता, तिथे नुसती घरातील कामा पुरतीच नाही तर, आर्थिक व सामाजिक स्तरावर देखील आहे. तिकडे घरखर्च देखील स्त्री समान हिश्श्याने करते. नवरा कमावतोय ना, तर मी कशाला खर्च करु? मी आपले माझी कमाई माझ्या साठीच खर्च करील, असा खुळचट विचार देखील पाश्चात्य स्त्री करीत नाही. तिकडच्या सामाजिक , कौटुंबिक व्यवस्थेमध्ये स्त्री स्वतंत्र आहे. स्त्रीच काय पुरुष देखील स्वतंत्र आहे. त्यामुळेच तिकडील स्त्री समस्या आणि भारतातील स्त्रीयांच्या समस्या यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे हे आपण समजुन घेतले पाहीजे.

वैदेहीच्या बोलण्याने मात्र, वरकरणी महीला दिवस साजरा करणे, एकत्र येणे, फोटो काढणे वगैरे वगैरे म्हणजे महीला दिन साजरा करणे नाही हे मला पुरते समजले. आपल्याकडे स्त्रियांच्या समस्या खुप गंभीर आहेत. स्त्री पुरुष समानता नसणे, कामाच्या ठिकाणी स्त्री असल्यामुळे कमी लेखणे जाणे, प्रवासात एकटी असल्यास वखवखलेल्या नजरांना सामोरे जाणे, त्याही पुढे जाऊन बळजबरी होईल की काय ह्या चिंतेने सदैव ग्रासलेले असणे, अशा अनेक गंभीर समस्या आहेत. ह्या समस्यांच्या मुळाशी आपण जाऊन पाहीले तर त्यांचे समाधान स्त्रीच्या स्वतःच्या हातात, किंवा निर्णय क्षमतेमध्ये नसते. एखाद्या पुरुष सहका-याने माझ्याशी कसे वागावे, हे ठरविण्यासाठी माझे वर्तन त्याच्याशी आणि सर्वांशी कसे आहे हे महत्वाचे आहेच. तरीही विकृत मानसिकतेला मर्यादा नसतातच. त्यामुळे अशा सर्व समस्यांचे समाधान त्या त्या पुरुषाच्या जडणघडणीवर आणि कायद्याच्या अमंलबजावणीवर अवलंबुन असते.

पण आज मी तुम्हाला एका अशा समस्ये विषयी सांगणार आहे की जी निर्माण स्त्रीनेच केली आहे. व जिचे समाधान देखील तिच्याच हातात आहे. म्हणजेच काय तर या समस्येसाठी सर्वस्वी जबाबदार स्त्रीच आहे.

नोकरी, व्यवसाय, करीयर, कुटुंब, घर, गोतावळा, समाज इतके सगळे सांभाळताना स्त्रीने स्वतच्या आरोग्याची समस्या गंभीर करुन ठेवली आहे. माझ्या कडे नेहमी अशा अनेक स्त्रिया येतात की ज्या भरगच्च पगाराची नोकरी करतात, एखाद्या मोठ्या कॉर्पोरेट मध्ये मोठ्या हुद्द्यावर काम करतात, अनेक जणींना नोकरी निमित्त अनेकदा प्रवास देखील करावा लागतो. तसेच माझ्या कडे गृहीणी देखील येतात.  त्यांच्या देखील आरोग्याच्या अनेक समस्या असतात. पण या सर्वांच्या समस्यांचे मुळ स्त्रीची स्वत कडे दुर्लक्ष करण्याची वृत्ती ही होय. स्वःतकडे दुर्लक्ष म्हणताना असे समजु नये की या स्त्रिया नीटनेटक्या नसतात. त्या मेकअप साठी वेळ देतात. पण सुंदर दिसण हे देखील स्वःतसाठी नसत. सुंदर दिसण्यासाठी केलेले प्रयत्न किंवा घालवलेला वेळदेखील स्वतःसाठी घालवलेला नसतो.

 

स्वतःसाठी नेमक काय केल म्हणजे असे म्हणता येईल की आपण स्वतची काळजी घेतोय?

तर स्वतःच्या सुंदर दिसण्यासोबतच स्वतःच्या निरोगी असण्यासाठी वेळ नियमित वेळ दिला तरच तुम्ही स्वःतच्या स्त्री असण्याची कदर करताय असे होईल. स्वतःच्या आरोग्यासाठी जर तुम्ही वेळ देऊ शकलात तर तुम्ही

 

  • नेहमी उर्जावान रहाल
  • नेहमी हसतमुख रहाल
  • कार्यतत्पर आणि कार्यकुशल व्हाल
  • आयुष्याच्या इतर कोणत्याही आघाडीवर सदैव सकारात्मक बदल तुम्ही घडवाल
  • सर्वात महत्वाचे असे की तुम्ही तुमच्या स्त्री असण्याचा आदर कराल.

जागतिक स्तरावर या वर्षी महीला दिनाची थीम #PressForProgress आहे. भारतातील विशेषतः शहरी भागातील स्त्रियांनी या महिला दिनाने औचित्य साधुन #StayFitStayHappy ही थीम अगदी रोजच जगण्यास सुरुवात करावी, तरच महिला दिनाचा काहीतरी उपयोग झाला असे म्हणता येईल.

माझ्या शी संपर्क साधण्यासाठी इथे क्लिक करा.

Facebook Comments

4 thoughts on “जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

WhatsApp chat