
नवरात्री, नवदुर्गा आणि उन्नत जीवन
नवरात्रीचे नऊ दिवसाचे महत्व
आपल्या संस्कृतीमध्ये नऊ या संख्येला विशेष महत्त्व आहे जसे नवविधा भक्ती, नवग्रह, नवरस, नवरात्री आणि नवदुर्गा! नवदुर्गा हे दुर्गा देवीचे नऊ अवतार. दुर्गेच्या नऊ रुपांतील शक्तीची उपासना यांतील प्रत्येक रूपाचे वैशिष्ट्य आहे. यांस मातृदेवतांचा समूह असेही म्हटले जाते. आगम ग्रंथामध्ये नवदुर्गेची नावे दिली आहेत.
नवदुर्गांच्या उपासनेने साधकाला तप, सदाचार, शांती, आरोग्य, शौर्य तसेच अनेक सिद्धीची प्राप्ती होते असे मानले जाते.
लक्षात असुद्या, नवरात्रोत्सव म्हणजे फक्त धार्मिक किंवा आध्यात्मिक अधिष्टाण असलेला उत्सव नाहीये तर यात सदाचारा, शांती, शौर्य या सोबतच आरोग्यामध्ये प्रगती देखील आपल्या पुर्वजांनी योजुन ठेवली आहे. आपले दुर्दैव असे आहे की आपण आजही फक्त अवडंबरांच्याच मागे लागतो व सण-उत्सवांचा मुळ गाभाच विसरुन जातो. आजच्या या लेख संकलनामध्ये जाणुन घ्या नवदुर्गा तसेच नवरात्रीचे धार्मिक, आध्यात्मिक महत्व काय आहे ते !
तर, अश्विन महिन्यात नवरात्रीच्या काळात करावयाची शक्तीची उपासना एरवीपेक्षा वेगळ्या पद्धतीने करतात.
ती पद्धत अशी– घरातील देव्हाऱ्यात देवीची प्रतिमा किंवा टाक असतो. तो तेथून उचलून वेगळ्या पाटावर ठेवतात. नऊ दिवस ही प्रतिमा किंवा टाक तेथून न हलवता तेथेच पुजला जातो. बाजूला पाण्याने भरलेल्या कलशावर विडय़ाची पाने व नारळ ठेवतात. त्यानंतर कलशाच्या सर्व बाजूंना शेतातील काळी टाकून त्यात गहू पेरतात. पाणी दिले की गव्हातून अंकुर फुटतात. कलशावरील नारळाला झेंडूची माळ बांधलेली असते. त्याच्या बाजूला समई आणि निरंजन तेवत असतात.
या काळात आदिशक्ती भगवतीचे गुणवर्णन करतात किंवा देवीसप्तशतीचे पाठ करतात. तांब्यावर नारळ ठेवून, सिद्ध केलेला कलश हा मानवी देहाचे प्रतीक आहे. सर्व प्रकारच्या शक्ती या कलशात विद्यमान आहेत, असे मानले जाते. जणू देहरूपी कलशच देवीपुढे मांडला जातो. योगशास्त्राचा अभ्यासही या नऊ दिवसांतच करायचा असतो. शरीररूपी कलशच योगरूपी अग्नीत भाजून शुद्ध करायचा आहे, असे येथे गृहीत धरतात. कलशाभोवती उगवलेल्या गव्हातून फार मोठय़ा शक्ती मिळतात. असा सावलीत वाढलेला गहू आणि त्याचा रस हे फार उत्तम शक्तिवर्धक औषध समजले जाते.
जुने त्वचेचे विकार, मूतखडा, दातांचे रोग, पोटदुखी, अस्थमा, वार्धक्य असे अनेक विकार या गहू रोपरसाने बरे होतात. ऋतुमानानुसार विश्वातील अनेक शक्तींचा आरोग्यवर्धनासाठी उपयोग करून घेण्याची आपल्या आयुर्वेदाची आणि धर्मशास्त्राची परंपरा आहेच! देव्हाऱ्यात रात्रंदिवस दिवा तेवत ठेवल्याने शक्तीच्या उपासनेला वेगळाच अर्थ प्राप्त होतो. तेजाच्या समोर बसून तेजच मागायचे असते.नवरात्रात ‘महिषासुरमर्दिनी’ म्हणून आपण देवीची उपासना करतो. ‘महि’ म्हणजे मन आणि ‘षा’ म्हणजे जसे. मनरूपी असुर शरीराचा ताबा घेतो आणि त्यातील चांगल्या गोष्टीचे निर्दालन करतो. त्या मनावर विजय मिळवून देण्याची प्रेरणा आपल्याला उपासनेतून मिळते. त्यामुळेच शक्तीच्या उपासनेसाठी नवरात्रीचा उत्सव केला जातो. कारण ‘शक्ती’ नसेल, तर ‘शिवा’चाही ‘शव’ होतो आणि म्हणूनच या चराचरामध्ये ‘शक्ती’ला असाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. लक्ष्मीमंत्रामध्ये सामथ्र्य, पराक्रम आणि प्राण हे शक्तीचे तीन अर्थ सांगितले आहेत. शक्तीची तीन रूपे आपल्याला परिचित आहेत. ‘महाकाली’ (तमोगुणी), ‘महालक्ष्मी’ (सत्त्वगुणी) आणि ‘महासरस्वती’ (रजोगुणी) या तीनही रूपांच्या उत्पत्तीची कथा ‘मरकडेय पुराणा’तील सप्तशतीत दिलेली आहे.
तिचा सारांश असा, लढण्याचे सर्व प्रयत्न संपल्यावर देवांनी दुर्गा, लक्ष्मी व पार्वती या स्त्री–देवतांकडे धाव घेतली. त्या वेळी आदिशक्तीने अभिवचन दिले आणि सांगितले की, ‘‘जेव्हा दैत्य– दानव तुम्हाला उपद्रव देतील, तेव्हा मी अवतार घेऊन त्यांचे निर्दालन करेन.’’
नवरात्र म्हणजे नऊ रात्रींचा उत्सव, असा आपण साधा सरळ अन्वयार्थ मांडतो. ‘नऊ’ या अंकाला अध्यात्मशास्त्रात असाधारण महत्त्व आहे. एकपेशीय जीवापासून मनुष्यशरीराची रचना होऊन मातेच्या उदरातून बाहेर येण्यासाठी लागणारा कालावधी नऊ महिने नऊ दिवस आहे. माणसाला कोणतीही सवय लागण्यासाठी नऊ दिवसांचा कालावधी पुरेसा असतो.
उपास्य देवतेची भक्ती नऊ प्रकारे करता येते. श्रवणम्, कीर्तन, विष्णुस्मरणं, पादसेवनम्, अर्चनम्, वन्दनम्, दास्यम्, संख्य आणि आत्मनिवेदनम्, यातून साकार होणारी भक्ती ‘नवविधा’ आहे. गणितात आणि शक्तितंत्रात नऊ हा अंक परिपूर्ण मानला गेला आहे. कारण नऊ या अंकाची कितीही पट केली तर येणाऱ्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज ही नऊच भरते. (जपमाळ १०८ मण्यांची असते हे
त्याचे कारण.) त्यामुळे नऊ हा शक्तिउपासनेत श्रीशक्तिरुप दर्शविणारा सर्वात मोठा आणि म्हणूनच महत्त्वाचा अंक मानला गेला आहे.
नवरात्रीच्या काळात आदिशक्तीच्या नऊ रूपांची उपासना केली जाते. पहिल्या दिवशी ‘शैलपुत्री’ म्हणजे तिच्या मूळ रूपाची पूजा केली जाते. दुसऱ्या दिवशी ‘ब्रह्मचारिणी’ म्हणजे ब्रह्मपद देणारी, तिसऱ्या दिवशी ‘चंद्रघंटा’ म्हणजे नावाप्रमाणेच शांतचित्त– आत्मबळ प्रदान करणारी, चौथ्या दिवशी ‘कूष्मांडा’ म्हणजे सर्व प्रकारच्या पीडांपासून रक्षण करणारी, पाचव्या दिवशी ‘स्कंदमाता’ म्हणजे यशस्विनी, सहाव्या दिवशी ‘कात्यायनी’ म्हणजे पालनपोषणकर्ती, सातव्या दिवशी ‘कालरात्री’ म्हणजे सर्वसंहारक, आठव्या दिवशी ‘महागौरी’ म्हणजे नवयौवना आणि नवव्या दिवशी ‘सिद्धीदात्री’ म्हणजे सकल मनोरथ पूर्ण करणारी म्हणून दुर्गेची पूजा केली जाते. या संदर्भात एक श्लोक आहे. तो असा –
‘प्रथम शैलपुत्रीच द्वितीयं ब्रह्मचारिणी॥
तृतीयं चंद्रघंटेति कुष्मांडेति चतुर्थकम्॥
पंचमं् स्कंदमातेती षष्ठमं कात्यायिनीति च।
सप्तमं कालरात्रीती महागौरीतिचष्टिमम्॥
नवमं सिद्धीदात्रीच नवदुर्गा प्रकीर्तिता:।’
नवरात्रीचे नऊ दिवसआणि नऊ रात्री या शक्तीच्या उपासना काळात देवीच्या विविध रूपांची आराधना केली जाते. रणांगणावर युद्धासाठी उभ्या ठाकलेल्या देवीचे केवळ उग्ररूपच डोळ्यांसमोर आणायचे नसते, तर त्याबरोबरच तिचे शांतिरूप, श्रद्धारूप, बुद्धिरूप, मातृरूप आणि त्याचबरोबर स्फूर्ती देणारे चेतनारूपही मनात साठवायचे असते.
दुर्गापूजेला धार्मिक संदर्भ जसा आहे, तसाच पारंपरिक आणि ऐतिहासिक संदर्भही आहे. काही अभ्यासकंच्या मते वैदिक काळात देवीला फारसे महत्त्व दिले गेले नव्हते, पण मोहेंजोदारो आणि हडप्पा येथील संशोधनावरून वेदपूर्वकाळापासून शक्तिउपासना प्रचलित असल्याचे सिद्ध होते. दुर्गा ही देवी उमा, पार्वती, अंबिका, रुद्रानी या नावाने ओळखली जाऊ लागली. महादेव म्हणजे शिव हा वेदपूर्वकालीन देव असावा. बौद्ध काळात देवदेवतांचे माहात्म्य कमी झाले आणि त्याच वेळी शक्तीच्या धार्मिक व परंपरागत पूजेत इतर प्रथांचा समावेश झाला.
इतिहास सांगतो, की भारतवर्षांत शक्तिउपासनेची परंपरा अतिप्राचीनआहे. कथा, दंतकथा, लिखित आणि मौखिक रूपातून ती व्यक्त होत आली आहे. अगदी आदि शंकराचार्यानीही आदिमातेच्या शक्तीचे अधिष्ठान मान्य केले होते. प्रभू रामचंद्रांनी दुर्गादेवीचे पूजन करून तिचा आशीर्वाद घेतला आणि नंतर रावणाचा वध केला.
सद्गुणाने दुर्गुणावर विजय मिळविण्याचे ते प्रतीक होते.
आजही नवरात्राची सांगता झाल्यावर दसऱ्याच्या दिवशी रावणाचे दहन केले जाते त्याचे हेच कारण आहे. परंपरा, इतिहास यांच्याबरोबर आशयघन प्रतीकात्मकताही नवरात्रीशी आणि दुर्गापूजेशी निगडित आहे, ती अशी!
पुढच्या लेखामध्ये जाणुन घ्या, नवरात्रीचे उपवास कसे करावेत जेणेकरुन आपणास शारीरीक, मानसिक तसेच आध्यात्मिक स्तरावर याचा कसा लाभ होईल ते !
धन्यवाद
कळावे
महेश व पल्लवी ठोंबरे
आपले निरामय निरोगी आयुष्याचे सांगाती