Stay Fit Pune - The weight loss center

how to sit properly

बसावे कसे?

बाळ जन्माला आले की सर्व प्रथम, पहिल्या सहा आठ महिन्यातच जी क्रिया शिकते ती म्हणजे बसणे. मग त्यानंतर भिंतीला धरुन उभे राहणे, मग उभे राहणे आणि मग चालणे. अशा पध्दतीने व क्रमाने आपल्या मोटर स्किल्सचा विकास होत असतो. जेव्हा आपणास बसण्याची क्रिया जमते तेव्हा आपण “जसे बसावयास हवे” अगदी तसेच बसतो. अगदी अचुक पध्दतीने, नैसर्गिक रित्या जसे बसले पहिजे तसेच आपण सगळे बसायचो. माझे बोलणे खोटे वाटत असेल तर तुमचा बाळपणीचा एखादा फोटो अवश्य पहा. किंवा गुगल sitting baby  असे सर्च करुन पहा.

तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की अगदी लहान बाळाला आपोआप जमणा-या गोष्टीविषयी लेख का म्हणुन लिहावा लागला महेश ला?

याचे उत्तर असे की, आपण निसर्गतः जरी अगदी बरोबर बसावयास शिकलो असलो तरी उत्तरोतर, जस जसे आपल्याला शिंगे फुटु लागतात तस तसे आपण निसर्गदत्त जे काही आहे ते सोडुन देऊन, समाज जे काही नकळत शिकवित असतो त्याचे अनुकरण करण्यास सुरुवात करतो. व यातुनच आपण योग्य जे आहे ते सोडुन देऊन, आरोग्याला घातक बसण्याची सवय अनुकरणातुन शिकतो.

या लेखातुन मला दोन गोष्टींवर भर द्यायच आहे.

एक – आपल्या घरातील मुलांना आपण चुकीच्या पध्दतीची सवय लागण्यापासुन वाचवायचे आहे.
दोन – आपण स्वःत योग्य पध्दतीने कसे बसावे हे शिकुन, तशी सवय लावुन घ्यायची आहे.

आधी म्हंटल्या प्रमाणे, लहान मुले मुलतः “बरोबरच” बसत असतात. त्यांना चुकीचे बसायला शिकवायचे काम आपण म्हणजे घरातील मोठी माणसे करीत असतो. मुळातच योग्य पध्दतीने बसायला शिकलेले लहानगे, मोठ्यांचे अनुकरण करुन चुकीच्या देहस्थितीची (Posture) सवय लावतात.  जसे चालणे, उभे राहणे हे देखील आपण चुकीचे करीत आहोत तसेच आपले बसणे देखील क्वचितच बरोबर असते. चुकीच्या देहस्थितीमुळे काय काय दुषपरिणाम होतात या विषयी पुढील लेखात मी सविस्तर लिहिणार आहेच.

या लेखामध्ये आपण आपण पाहुयात बसण्याची योग्य, लाभदायक स्थिती कोणती !

आपल्याकडे सहसा दोन प्रकारे आपणास बसावे लागते. पहिले म्हणजे ऑफीसात असताना, खुर्चीवर बसणे व दुसरे कधीकधी जमिनीवर बसणे. या दोहोंच्या दरम्यान जे काही आहे ते सगळे टाळले पाहिजे. उदा – सोफ्यावर आरामशीर बसणे, इत्यादी.

खुर्चीवर बसुन काम करावे लागणारे अनेक जण आहेत. तर आधी जाणुन घेऊ खुर्चीवर नीट कसे बसावे ते.

 • खुर्चीला पाठ टेकण्यासाठी मागे एक सपोर्ट असतो. तो आपण बसतो त्या फळीशी काटकोनात असतो. खुर्चीमध्ये बसताना आपले नितंब (Buttocks), मागील उभ्या फळीला टेकेल इतके मागे सरकुन आपण बसले पाहीजे. जर आपण मागे सरकुन बसलो तर आपल्या पाठीच्या मणक्याला मागच्या फळीचा आधार मिळतो. या स्थितीमध्ये असताना, आपल्या पाठीच्या मणक्याचे तीन हलके बाक देखील तसेच राहतील याची काळजी घ्यावी. सुरुवातीस तुम्हाला खुर्चीमध्ये अगदी मागे सरकुन बसावे लागेल. पण आठ दहा दिवसात, तुम्ही मागे न सरकता देखील योग्य पोस्चरमध्ये बसु शकाल.
 • आपल्या शरीराचे वजन आपल्या दोन्ही नितंबांवर समान आले पाहिजे.
 • गुडघे देखील जमिनीकडे काटकोनामध्ये वळलेले असावेत. पाय मात्र एकमेकांमध्ये घडी करुन अडकवु नका.
 • तळपाय जमिनीवर सपाट ठेवा. शक्य झाल्यास , पायाखाली सहा इंच उंचीच एखादा पाट ठेवता आला तर बरे, जेणेकरुन आपले गुडघे, नितंबाच्या थोडे वर राहतील.
 • एका स्थितीमध्ये ३० मिनिटांपेक्षा जास्त बसु नये. म्हणजे कधी तुम्ही मागे सरकुन बसा किंवा कधी थोडे पुढे सरकुन बसा.
 • तुम्ही संगणकावर काम करीत असाल तर तुमच्या खुर्चीची उंची तुमच्या उंचीनुसार बदलुन घेऊन, संगणकाच्या स्क्रिनच्या अगदी समोर, तुमचे डोळे येतील असे बसावे. यामुळे मानेचे दुखणे कधी होणार नाही.
 • खुर्चीमधुन उठताना देखील काळजी घ्यावी. खुर्चीमधुन आधी थोडे पुढे सरकावे, मग पाय सरळ करुन उठावे. उठताना, कमरेतुन पुढे अथवा मागे झुकु नये.
जमिनीवर बसताना, कसे बसावे.

 • जमिनीवर असु किंवा खुर्चेमध्ये असु, बसताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची. ती म्हणजे आपले नितंब आणि पाठीचा कणा यामध्ये साधारण काटकोन असला पाहिजे. जे नैसर्गिक तीन बाक (वळणे) आपल्या मणक्यामध्ये आहेत ती तशीच व तेवढीच असली पाहीजे. पोक आणुन बसु नये.
 • जमिनीवर बसताना एकतर आपण साधी मांडी घालुन बसु शकतो. यास योगशास्त्रामध्ये सुखासन म्हणतात. थोड्या थोड्या वेळाने आपण मांडीची घडी बदलु शकतो. म्हणजे ख्कालचा पाय वर व वरचा पाय खाली. पण महत्वाची गोष्ट विसरता कामा नये. ती म्हणजे, पाठीचा कणा व नितंब यामधील काटकोन.
 • सुखासना व्यतिरिक्त अन्य बरीच आसने, पध्दती आहेत. जसे पद्मासन, सिध्दासन, वज्रासन इत्यादी. गप्पा मारताना, टिव्ही पाहताना, मोबाईल वर फेसबुक, व्हॉट्सॲप वाचताना
  (बघा बर लगेच प्रयत्न करुन जमतय का?) देखील अशाच पध्दतीने बसण्याचा कटाक्षाने प्रयत्न करा.
 • हल्ली प्रत्येक घरामध्ये टाईल्स आहेत. या टाईल्स वर सतरंजी किंवा कालीन अंथरुन मगच त्यावर बसावे.

आपली देहस्थिती म्हणजेच पोस्चर आपल्या आरोग्यासाठी पोषक आहाराइतकेच महत्वाची असते. उभे राहतानाची स्थिती, बसलेले असतानाची स्थिती, चालतानाची स्थिती व गती, एखादे वजन उचलतानाची स्थिती व गती, हे सगळे जर आपण योग्य पध्दतीने केले तर आपण निरामय निरोगी जीवनशैली कडे एक खुप मोठी झेप असेल.

तेव्हा लक्षात असु द्या दोन गोष्टी.

एक – आपल्या घरातील मुलांना आपण चुकीच्या पध्दतीची सवय लागण्यापासुन वाचवायचे आहे.
दोन – आपण स्वःत योग्य पध्दतीने कसे बसावे हे शिकुन, तशी सवय लावुन घ्यायची आहे.

 

आमचे लेख आवडले तर नक्की तुमच्या मित्र परिवारासोबत शेयर करा.

कळावे

महेश व पल्लवी ठोंबरे – 9923062525

निरामय आयुष्याचे आपले सांगाती.

Facebook Comments

ADD COMMENT

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.