
चांगले आयुष्य जगायचेय ? मग गाढ झोपा…(भाग १)
मी जेव्हा जेव्हा माझ्या गावी मुक्कामाला असतो, तेव्हा तेव्हा मला माझ्या आई-वडीलांचे विशेष कौतुक वाटते. नुसते माझे आई-वडीलच नाहीत तर गावकडील सगळीच जुनी जाणती माणसे या कौतुकास पात्र आहेत. कौतुक कशाचे आहे माहितेय का मित्रांनो तुम्हाला? तर हे लोक मस्तपैकी झोपतात.
तुम्ही म्हणाल झोपतात तर सगळेच त्यात कौतुक करण्यासारखे एवढे काय आहे बरे? सांगतो , मित्रांनो!
मला आठवतय लहान पणी जेव्हा गावी असायचो तेव्हा आमच्या गावाकडे, सगळाच्या सगळा गाव आठ साडे आठलाच शांत झालेला, झोपी गेलेला असायचा. पहाटे पहाटेच आम्हाला जाग यायची. आमच्या जागे होण्याचे कारण असायचे आईचे खराटा घेऊन, अंगण साफ सफाई करण्याचे काम. आम्ही देखील मग पहाटेच झोप पुर्ण होऊन उठायचो. आजच्या पिढीला आणि शहरात राहणा-या माणसांना हे थोडे अवघड जाईल पचायला, पण खरच आठ साडे आठ ला गाव शांत झालेले असायचे. आणि आजही आमच्या मुळशीतील अत्यंत दुर्गम भाग म्हणजे ताम्हिणी खो-यातील अनेक गावे अशीच आहेत. कदाचित हा असा प्रकार गावाकडील लोकांना नवीन नाही. निसर्गाशी जुळते घेताना, निसर्गनियमंचा मनुष्याच्या आरोग्यावर होणा-या परिणामांचा अतिशय खोलवर अभ्यास आपल्या पुर्वजांनी करुन ठेवला होता. भलेही तो तसा कुठे लिहुन ठेवला असेल अथवा नसेल पण तो अभ्यास त्यांच्या दैनंदिन जगण्यात मात्र प्रत्यक्षात उतरलेला होता.
हल्ली शहरांमध्ये व काहीप्रमाणात गाव-खेड्यांकडे देखील लवकर झोपणे म्हणजे मागासलेले पण आहे की अश्या आविर्भावाने, होत नाही. लवकर झोपत नाहीत तर करतात काय बरे हे लोक, तर रात्री उशिरापर्यंत टिव्ही पाहत बसणे. काही लोक असतात की जे रात्रीच्या वेळी काम करतात. अनेक लोक रात्री-अपरात्री मिटींगा, पार्ट्या झोडत असतात. हे सगळे प्रकार आहेत प्रदुषित जीवनशैलीचे. होय, तुम्ही जर अशा प्रकारचे आयुष्य जगत असाल तर मी ठामपणे सांगतो की तुमची जीवनशैली देखील प्रदुषित-कलुषित झालेली आहे. ती दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला कोणताही डॉक्टर मदत करणार नाही की अन्य कुणीही नाही. दुरुस्ती तुमची तुम्हालाच करावी लागेल.
काही लोक म्हणतील , प्रदुषित आहे, कलुषित आहे असे तुमचे म्हणणे आहे. आम्ही तर रात्री उशिरापर्यंत जागणे ‘एन्जॉय’ करतो. आम्हाला आवडते जागणे, चॅटींग करणे, पब-जी गेम खेळणे, सिनेमा पाहणे, पार्ट्या करणे. व आम्हाला त्यामुळे काही नुकसान देखील होत नाही.
चला तर मग पाहुयात झोपण्याचा (लवकर) आणि आपल्या निरामय आयुष्याचा संबंध काय व कसा आहे ते!
गावाकडील लोकांचे (जे गावात राहुन ग्रामीण जीवन जगतात त्यांचे, फार्म हाऊस वर राहतात त्यांचे नाही बरका!) जीवनमान जास्त आहे. त्याप्रमाणे त्यांचे आरोग्य देखील शहरातील त्याच वयाच्या दुस-या एखाद्या मनुष्या पेक्षा जास्त चांगले असते. हे धडधडीत सत्य आपणास उघड्या डोळ्यांनी पाहता येईल. कुणाला पहायचे असेल प्रत्यक्ष तर आवर्जुन आमच्या गावी या कधीतरी.
निरामय आरोग्य मिळविण्यासाठी, ते टिकविण्यासाठी तीन गोष्टी खुपच महत्वाच्या आहेत. त्यातील पहिली आहे संतुलित, परिपुर्ण आहार. या विषयी मी माझ्या अनेक लेखांमधुन अनेकदा सांगत आलो आहेच. दुसरी महत्वाची गोष्ट आहे व्यायाम. याविषयी देखील मी अधिक अभ्यासपुर्ण व स्वानुभवाचे लेख लिहिले आहेत. हे सारे लेख याच वेबसाईट मधील ब्लॉग सेक्शन मध्ये तुम्हाला वाचता येतील. निरामय आरोग्यामध्ये तिसरा आणि तितकाच महत्वाचा घटक आहे झोप.
आज आपण सर्वात आधी पुरेशी झोप न घेतल्याने काय काय नुकसान होते ते पाहुयात.
आज किमान दोन तृतीयांस प्रौढ व एक तृतीयांस मुलांना पुरेशी झोप मिळत नाही. पुरेशी झोप म्हणजे नेमकी किती झोप ते आपण पुढे पाहुच.
झोप पुरेशी झाली नसेल तर आपणास सर्वात पहिला दुष्परिणाम जाणवतो तो म्हणजे थकवा. हा परिणाम तातडीचा असतो. लागलीच दिसतो व आपल्या एकुणच कार्यक्षमतेवर प्रभाव करतो. पण काय फक्त थकवा येणे हे एकच नुकसान अपु-या झोपेने होते? चला आपण समजुन घेण्याचा यत्न करुयात.
- शारीरीक हालचालींवर परिणाम होणे – एखाद दुसरी रात्र जरी तुम्हला झोप पुरेशी मिळाली नसेल तरी तुम्ही शारीरीक क्षमतांमध्ये होणारा नकारात्मक बदल अनुभवु शकता. विचार करा सातत्याने म्हणजे नेहमीच अपुरी झोप घेतल्याने तुमच्या एकुणच शारीरीक क्षमतेचे काय होईल बरे?
- एखाद्या दारुड्याने भरपुर दारु पिल्यावर त्याची जी अवस्था होते तशीच अवस्था कुणाचीही होऊ शकते जर त्यांना सलग पाच दिवस पुरेशी झोप मिळाली नाही तर. यामुळे मानसिक क्षमतेवर जबरद्स्त परिणाम होतो .
- याचेच पडसाद तुमच्या वागण्यात ही उमटतात. तुम्ही भांडखोर होता. तुम्ही अनैतिक मार्गांचा अवलंब करण्याकडे झुकता.
- याच्याही पेक्षा जास्त भयावह परिणाम म्हणजे तुम्हाला भयानक आजार देखील होऊ शकतात. आजार तर कुणालाही होऊ शकतात. पण झोप जर अपुरी असेल तर लठ्ठ्पणा, मधुमेह व हृद्य विकाराचे तुम्ही अगदी सहज बळी पडु शकता.
- अपुरी झोप याही पुढे जाऊन अल्झायमर सारख्या क्रिटीकल आजारांना निमंत्रणा देऊ शकते.
- कमी झोपेमुळे तुम्ही जास्त खाता. यामुले शरीरात आवश्यकतेपेक्षा जास्त कॅलरीज जातात व परिणामी तुम्ही लठ्ठ होत जाता.
- आपल्या स्मरणशक्ति व लक्ष केंद्रीत करण्याची क्षमता देखील अपु-या झोपेमुळे कमी होते.
- अपु-या झोपेमुळे तुम्ही ट्रेकींग, रनिंग सारख्या खेळात अगदी लागलीच दमुन जाता.
- अपुरी झोप हे तुमच्या निराशेचे एक कारण असु शकते.
- अपुरी झोप पोटाच्या अनेक विकारांना जन्म देत असते.
- समाजात वागताना तुम्ही हेकेखोर होऊन जाता व इतरांच्या भाव-भावना समजुन घेण्यात देखील तुम्ही कमी पडता.
अपु-या झोपेमुळे एवढे सगळे नुकसान होते.
जुन्या काळातील ग्रामीण संस्कृतीमध्ये “लवकर निजे लवकर उठे” हे तत्व लोक जगण्यात उतरवलेले होते. यामुळे त्यांनी त्य काळात कसलाही जिम जॉईन न करताही, ते लोक ठणठणीत होते. त्यांचा आहार देखील मजबुत होता. एखादा मध्यम वयस्क ग्रामीण मनुष्य अगदी सहज तीन-चार भाकरी चुरुन-कुस्करुन हाणायचा व खाल्लेल सगळ पचवण्याची क्षमता देखील त्यांच्याकडे होतीच. योग्य आहार-विहार व निद्रा हे निरामय आरोग्याचे तीन आधार स्तंभ होते. आजकालच्या बदलत्या जीवनशैली मुळे आपण ते गमावुन बसलो आहोत.
झोप व्यवस्थित, पुरेशी म्हणजे किती, कोणत्या वयाच्या माणसाला किती तासाची झोप गरजेची आहे हे आपण पुढील लेखात वाचुयात.
सोबतच गाढ-चांगल्या-पुरेशा झोपेमुळे तुम्हाला काय काय लाभ होतात, जर काही कारणस्तव झोप होत नसेल पुरेशी तर काय उपाय करावे लागतील, गाढ झोप कशी मिळविता येईल हे सारे आपण पुढच्या भागात पाहुयात.
वाचत रहा माझे लेखन व प्रतिक्रिया अवश्य द्या. माझ्याशी संपर्क साधण्यासाठी , खालील फॉर्म भरुन पाठवा!
कळावे
आपले
महेश व पल्लवी ठोंबरे – 9923062525
Author is a well-known fitness coach from Pune. He has helped thousands of people with weight loss and weight gain. He runs a fitness club, weight loss centre in Hadapsar and Kothrud, Pune. Please feel free to contact him by submitting details below.