
श्रावणातील उपवास – जसा शरीराचा तसाच मनाचा देखील
सर्वप्रथम आपण उपवास म्हणजे काय ते पाहुयात. उपवास या शब्दाची फोड उप+वास अशी होते. “उप” या शब्दाचा अर्थ आहे “समीप” म्हणजे “जवळ” व वास या शब्दाचे मुळ आहे “वस”. वसणे याअ अर्थाने. वास म्हणजे राहणे. तर दोन्ही शब्द जोडुन अर्थ काय होतो? “जवळ राहणे”…
परंपरागत अर्थ असा आहे की देवाच्या अधिक व नित्य जवळ राहणे, जाणे म्हणजे उपवास होय. दैनंदिन जीवनातील व्यवधान निर्माण करणा-या अनेक बाह्य गोष्टींना बाजुला सारुन एकच लक्ष्य ठेवणे व त्यासाठी जे जे करणे असेल ते ते करुन देवाच्या अधिकाधिक जवळ राहणे म्हणजे उपवास होय. उपवासाचा खरा अर्थ हा आहे.
पण आपल्याकडे एक अजब अर्थ तयार झालेला दिसतो. तो म्हणजे काहीही न खाता किंवा खिचडी खाऊन किंवा कमी खाऊन, बाह्य अवडंबरे करुन राहणे म्हणजे उत्तम उपवास. जर हे खरे मानले तर आज मितीला आपल्या देशात नव्हे जगभरात अन्नान्न करुन, पाठ आणि पोट एक झालेले अनेक गरीब आहेत ज्यांना धड एक वेळेस देखील खायला मिळत नाही. मग त्यांचा ही उपवासच होईल की सध्याच्या उपवासाच्या अर्थाने. उपवास म्हणजे देवाच्या जवळ राहणे.
पण हल्लीच्या काळात खरच आपण काम धंदे सोडुन दिवसभर देवघरात, हरीनामाचा जप करु शकु का? आणि हो जर असे केले तर उत्तमच. अशा जपाचे अनेक फायदे आहेत जे आपल्या व्यक्तित्वाच्या विकासासाठी खुपच महत्वाचे योगदान देत असतात. आपण ज्यावेळी आपले मन म्हणजेच चित्त देवाच्या ठिकाणी एकाग्र करीत असतो त्या वेळी ख-या अर्थाने आपण चित्त एकाग्र करण्याचा अभ्यासच करीत असतो.
आपल्या देशात सध्या शरीराच्या सुंदरतेसाठी, सुदृढतेसाठी अनेक लोक प्रयत्न करीत असतात. पण एक गोष्ट सगळेच विसरतात ती ही की आपले शरीर केवळ एक साधन आहे. मुळ प्रेरणा आपले मन च देत असते आपल्या शरीरास काम करण्याची. आपले मन जितके जास्त निरोगी असेल तितके जास्त आपले शरीर कार्यक्षम होऊन आपण आपल्या ध्येयाच्या अधिक जवळ पोहोचु.
तर श्रावण मासामध्ये शरीराच्या शुचिते सोबतच मनाच्या शुचितेसाठी आपण काय करु शकतो का याचा आपण थोडा विचार करुयात.
आपले मन नेहमी प्रसन्न राहील यासाठी आपण काही गोष्टी करण्यास सुरुवात केली पाहीजे.
- संपुर्ण श्रावण महिन्यामध्ये मनामध्ये सत्व गुणांचा विकास होईल अशा गोष्टी केल्या पाहिजेत. जसे सकाळ संध्याकाळ छान भावगीते ऐकणे, एखादे किर्तन प्रवचन, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट चे लेक्चर, मनाच्या ताकत ओळखण्यासाठी चे व्हिडीयो युट्युब वर पाहु शकता.
- श्रावण मासात ज्या दिवशी उपवास असेल त्या दिवशी आपण मौन व्रताचे पालन करण्याचा प्रयत्न करु शकतो. अगदी ठरवुन दिवसातील किमान तीन-चार तास जरी असे करण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा खुप उपयोग होतो.
- कुणाचीही कोणतीही बहुलुल्य संपत्ती असो किंवा अगदी क्षुल्लक वस्तु किंवा क्षुद्र स्वार्थ असो, मनाने किंवा वाचेने किंवा कायेने दुस-या कुणाच्या कशाचीच अपेक्षा न धरता, आपल्याकडे जे आहे त्यात समाधानी व आनंदी राहण्याचा प्रयत्न करणे. आपल्याकडे जे आहे त्यातच आनंदी राहणे याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या आयुष्यात प्रगती करु नये. सत-मार्गाने पैसा अवश्य कमवावा व तो खुप सारा कमवावा पण कसलेच मुल्य न देता कुणाचे ही काही ही घेऊ नये.
- दररोज आपल्या अंगभुत आनंदाचा अनुभव घ्या. आपण आहोत, अजुनही आहोत ही खुप मोठी गोष्ट आहे. आपल्या असण्याचा आनंद साजराअ करा व इतरांना देखील आनंदीत करा. Spread the happiness.
- शक्य झाल्यास दर उपवासाच्या दिवशी आपल्यातील एक दुर्गुण शोधुन काढण्याचा प्रयत्न करा. स्वःत विचार करुन, आठवण्याचा प्रयत्न करा की आपल्या मध्ये काही दुर्गुण आहे का? व असेल तर तो दुर्गुण कुठे तरी लिहुन ठेवा व तो दुर्गुणा दुर करायचा संकल्प दिवसातुन किमान २१ वेळा करा. याचे मानसशास्त्रीय महत्व आहे. यामध्ये आणखी एक युक्ति तुम्ही वापरु शकता. ती म्हणजे आपल्या जवळच्या माणसास प्रेमपुर्वक विचारणे. तुमच्यात काय दुर्गुण आहे याविषयी आपल्या पत्नी,पती, मुले, मुलगी , मित्र , नातेवाईक यापैकी एकास, जो तुमच्या अगदी जवळचा आहे व त्यास तुमचे दोष देखील माहिती आहे अशा माणसाची मदत तुम्ही घेऊ शकता.
वर सांगितलेली पंचसुत्री आपण श्रावणातील मनाच्या उपवासासाठी करा. पुर्वीच्या काळी व्रत वैकल्यांच्या माध्यमातुन देखील या सा-या गोष्टी होत होत्याच. सध्या संदर्भ बदलले आहेत. जीवनशैली बदलल्या आहेत. तसेच उपवासाचे अधिष्टान देखील बदलणे गरजेचे आहे असे मला वाटले.
तुम्हाला माझा हा लेख जर आवडला असेल तर अवश्य तुमच्या मित्र मंडळी नातेवाईंकांसोबत शेयर करा.