Stay Fit Pune - The weight loss center

गणेशोत्सव, मोदक आणि माझा वेटलॉस

The Story Behind PopIt

तुम्ही जर तुमचे वजन कमी करण्याचा संकल्प केला असेल तर येणारा सण-उत्सवांचा काळ तुमच्या साठी अधिक काळजीचा आहे. मी देखील अशाच अवस्थेमधुन गेलेलो असल्याने मला तुमची अवस्था समजु शकते. अशा मोह प्रसंगी मी स्वःतला कसे सांभाळले व माझे वजन कमी करण्याचे ध्येय कसे गाठले या विषयीचा माझा एक अनुभव.

Weight loss and wellness coach in Pune

By Mahesh Thombare

लंबोदर पितांबर …म्हणत आपण गणेशोत्सवामध्ये अगदी दररोज सकाळ संध्याकाळ गणेशाची, समर्थ रामदास कृत आरती म्हणतो करतो. गणेशोत्सवामध्ये घरातील प्रामुख्याने बच्चे कंपनी खुपच उत्साही असते. गणपतीसाठी घरात छोटा मंडप, आरास इत्यादी करण्यापासुन ते अगदी दररोजची नेमाची आरती न चुकता करण्यापर्यंत ही बच्चे कंपनी हिरीरीने भाग घेतात.

लहान मुलांप्रमाणेच थोरा मोठ्यांच्या दैनंदीन जीवनात गणेशाच्या आगमनाने उत्साह, थोडे वेगळेपण येत असते. सायंकाळी आरती चुकु न देण्याची एक कौटुंबिक जबाबदारीच करत्या धरत्या माणसांकडे न कळत आलेली असते. एरवी काम धंद्यामुळे रात्री अपरात्र होत असत्ते घरी पोहोचायला, गणपती बाप्पांच्या आगमनामुळे सगळे कसे सुरळीत होते आठेक दिवसांसाठी.

साधारण पाच वर्षापुर्वी मी माझा वेट लॉस सुरु केला. दोन-तीन महिन्यांमध्येच मला त्यात चांगले यश मिळाले सुध्दा. नेमके त्याच २-३ महिन्यांच्या कालावधीत बाप्पाचे आगमन झाले. आमच्या घरी, गावी, शहरातील सोसायटीमध्ये,चौकात सगळीकडे बाप्पांचेच राज्य.

वेट लॉस करताना मी माझ्या खाण्यापिण्यावर विशेष लक्ष ठेवले होते. पण गौरी-गणपती, त्यापाठोपाठ नवरात्र, दसरा दिवाळी अशी आपल्या पारंपारीक संणांची रांगच लागते नेहमी. तशी त्यावर्षी सुध्दा हे सर्व आले. वेट लॉस करताना सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या खाण्याच्या अति तीव्र इच्छेवर विजय मिळवायचा असतो.

त्यावर्षी एका बुधवारी आमच्या घरच्या बाप्पाला उकडीच्या मोदकांचा नैवेद्य करण्यात आला. व नेमका मी देखील घरी असल्याने, नैवेद्य दाखवण्याचे काम मलाच पार पाडावे लागणार होते. एरवी नैवेद्य दाखवुन, आरती झाल्यावर सर्वांना प्रसाद म्हणुन उकडीचे मोदकच खायला दिले जातात. यावर्षी देखील असेच होणार होते. आरती सुरु झाली. व माझ्या मनात मात्र प्रसादात मिळणा-या उकडीच्या मोदकांचा गोड स्वाद व त्या विरुध्द माझी वजन कमी करण्याची इच्छा असे द्वंद्व सुरु झाले.

मनात एकेक विचार येत होता. त्याच्या मागील वर्षी मोदकांचा नैवेद्य, मग प्रसाद व मग रात्रीच्या जेवणात यथेच्छ ताव मारला होता मी उकडीच्या मोदकांवर. इतका की आधीच ढेरपोट्या असलेल्या मला जेवणाच्या जागेवरुन उठण्यासाठी जमीनीला हात टेकवावा लागला होता. तेव्हा त्या आठ दिवसात मी पल्लवीला दोन तीन वेळा फर्माईश केली होती, पुन्हा उकडीचे मोदक बनवण्याची. उकडीचे मोदकांसोबतच गौराईंच्या वेळी पुरणपोळीचा स्वयंपाक. कटाची आमटी, भजी, गरमागरम दुधाची डीश व त्यात एक दोन चमचे अस्सल गावाकडचे गावरान तुपाची धार. अहाहा…

“लंबोदर पितांबर” हे शब्द कानावर पडुन मी पुन्हा भानावर आलो. मागच्या वर्षीच्या आठवणी, त्यातुन उत्पन्न झालेला मोदक खाण्याचा मोह व या वर्षीचा वजन कमी करण्याचा संकल्प या युध्दामध्ये कोण जिंकणार माहित नव्हते. नकळत मनात “लंबोदर” या शब्दाविषयी विचार सुरु झाले. अरेच्च्या गणपती बाप्पा तर स्वःतच मोठ्या उदराचा, म्हणजे मोठ्या पोटाचा आहे. त्याला मोदकाचा नैवैद्य दाखवतात याचा अर्थ बाप्पा मोदक खातही असावा व त्याला मोदक आवडतही असावा. म्हणजे मोदक खाल्ल्याने फार काही बिघडणार नाही. बाप्पा स्वःतच ओव्हरवेट आहेत, मोदक खातात तर आपणही खाल्ले तर कुठे बिघडले. चला तर मग आरती संपल्यावर, प्रसाद म्ह्णुन मोदक हातावर आला तर नाही म्हणायचे नाही. ठरल तर मग, मोदक खायचा (खायचे).

“घालीन लोटांगण” झाले आरती संपली. आरतीचे ताट माझ्या पुढे आले. मी आरतीवरुन हात फिरवुन, नमस्कार केला. आता मोदक देखील आला समोर. माझा हातही पुढे सरसावला. हे सगळे आपोआप होत होते. मला समजत होते काय सुरु आहे ते, तरीही मी सःतला थांबविण्याचा प्रयत्न केला नाही. किंबहुना असा प्रयत्न माझ्या कडुन होऊ नये असेच मला वाटत असावे. इंग्रजी मध्ये क्रेव्हिंग म्हणतात याला. हातावर मोदक आला. हाताची बोटे मोदकाभोवती गुंडाळली गेली. करांगुळी सोडुन बाकी सगळ्या बोटांमध्ये मोदक पकडुन, माझा हात माझ्या तोंडाकडे गेला…पहीला घास तुटला मोदकाचा..अहाहा..तोच मागच्या वर्षीचा अनुभव…काय ती अवीट गोडी उकडीच्या मोदकाची!!!! एक दोन घासात मोदक संपला.

मन तृप्त झाले. वजन कमी करण्याची इच्छा व मोदक खाण्याची इच्छा यात मोदक खाण्याची इच्छा जिंकली होती. व या विजयात खुद्द बाप्पांचा मोठा हात होता. “लंबोदर” या एका शब्दामुळे हा विजय मिळाला होता.

आरती झाली. आई व पल्लवी घरातील इतर कामे उरकण्यासाठी किचन मध्ये गेली. मनोमन बाप्पांचे आभार मानुन मी देखील लॅपटॉप सुरु करुन इ मेल चेक करु लागलो. इतक्यात मला लंबोदर शब्द पुन्हा आठवला. गुगल मध्ये लंबोदर शब्द टाकुन सर्च केले लगेच. व मघाशी झालेल्या युध्दात, मनाने मिळवलेला विजय व त्यात बाप्पांचा आशीर्वाद हे सगळे कसे खोटे होते ते समजले. लंबोदर म्हणजे नक्की काय याचा अर्थ मला समजला.

गणपती बाप्पाचे पोट मोठे आहे. याचा अर्थ गणपती बाप्पां ढेरपोटे आहेत असा जो मी घेतला होता, माझ्या स्वःतच्या सोयीने, तो सपशेल चुकीचा होता. गणपती बाप्पाच्या प्रत्येक अवयवाचे एक सांकेतिक महत्व आहे. लहान डोळे सुक्ष्म निरीक्षण, तसेच एकाग्रतेचे प्रतीक आहे, मोठे कान “दुस-यांचे ऐकण्याचे प्रतीक (नुसतेच बोलत राहणे बरोबर नाही)” तसेच मोठे पोट देखील एका उदात्त सदगुणाचे प्रतीक मानले जाते. बाप्पा विघ्नांचा नाशकर्ता आहे. तो सगळ्या विघ्नांना आपल्या उदरात सामावुन घेतो. पचवतो. नुसतीच विघ्ने नाहीत तर संकटे समस्या यांपासुन पळुन न जाता, त्यांना सामोरे जाण्याचा संदेश बाप्पा देत असतात. हे सगले वाचण्यात माझा तास भर गेला असेल.

हे वाचुन मात्र माझे डोळे उघडले. माझे वाढलेले वजन माझ्या समोरील, माझ्या कुटुंबियासमोरील एक मोठे संकटच होते. या संकटापासुन माझे व कुटूंबाचे संरक्षण करणे गरजेचे होते. व हे करताना विघ्ने खुपच येत होती व भविष्यात देखील येतीलच याची जाणीव मला झाली. मला आणखी एक गोष्ट समजली ती म्हणजे खरच एखाद दोन मोदक खाल्ल्याने फार काही बिघडणार नव्हते. पण खाण्याचा मोह बळावत जाऊन, माझे माझ्यावरील नियंत्रण सुटण्यात याचा परीणाम होणार होता. व नियंत्रण सुटणे म्हणजे संकटाकडे कानाडोळा करण्यासारखे होते.

तोपर्यंत पल्लवीने ताटे वाढली होती. माझ्या ताटासमोर मी बसलो. गच्च भरलेले ताट! नुकतेच काहीतरी वाचलेले, त्यामुळे आरतीच्या वेळी जसा युध्द प्रसंग झाला तसा यावेळी झाला नाही. पल्लवीने माझ्या गच्च भरलेल्या ताटाशेजारी एक मोकळे ताट देखील आधीच ठेवले होते. मला काअय समजायचे ते समजले. मी स्वःतच्या हाताने, आहार नियमनामध्ये जे बसत नाही ते ताटातुन काढुन मोकळ्या ताटात ठेवले. पुन्हा एकदा या प्रसादास नमस्कार करुन, रात्रीचा मिताहार घेतला.

अवघड प्रसंग होता. बाप्पांचा आशीर्वाद व सदगुणी बायको यामुळे मी माझे वजन या सण-उत्सवांच्या तीन महिन्यांतच कमी केले. पुढचे आणखी साधारणपणे एक वर्ष मी पथ्ये पाळली.

सध्या मी यथेच्छ जरी नाही तरी किमान ४-५ मोदक, एखादी पुरण पोळी प्रत्येक सणाउत्सवात खाऊ शकतो.

वजन कमी करतानाच्या दिवसांमध्ये विशेषकरुन स्वतःवर लक्ष ठेवणे गरजेचे असते. कदाचित मी वजन कमी करण्याच्य फंदात पडलो नसतो तर मला असे प्रश्न किंवा द्वंद्व पुढे आलेही नसते. व मी यथेच्छ ताव मारीत राहिलो असतो जेवणावर, गोड धोडावर. पण ते किती काळ करु शकलो असतो. वाढलेल्या वजनामुळे कधीना कधीतरी मला भयानक आजार झाले असतेच. व आज जे मी नियंत्रीत पणे गोडधोड खातो ते देखील मला कधीही खायला मिळाले नसते.

असो, गणेशोत्सवाच्या निमित्ताने मला आठवलेला हा माझा अनुभव तुमच्या सोबत शेयर करताना हेतु एवढाच आहे की वजन कमी करण्याच्या दिवसांमध्ये स्वःतला सांभाळा, शक्य झाल्यास माझ्या सारख्या (मी तज्ञ आहे बरका आहार नियोजनातील !!) एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या, तुमचा डायट बनवुन घ्या. ध्येय निश्चित करा व टप्प्या टप्प्याने ध्येय गाठा.

कळावे

 

महेश व पल्लवी ठोंबरे

तुमचे निरामय, निरोगी, चपळ आयुष्याचे सांगाती.

9923062525

Facebook Comments

Comments
  • reply
    Archita Vijaykumar Malge
    September 7, 2019

    Khup Sundar ?

ADD COMMENT

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.