Stay Fit Pune - The weight loss center

Art of Parenting in Pune

प्रभावी पालकत्व

पाश्चात्य देशांमध्ये विशेषतः युरोप अमेरीके मध्ये प्रभावी पालकत्वा मध्ये एक खासियत आहे. ती खासियत अशी की त्या पालकत्त्वाचे ध्येय मुलांसाठी किंवा भावी पिढ्यांसाठी संपत्ती तयार करुन ठेवणे असे नसुन आपल्या मुलांना संकटांना सामोरे जाण्यासाठी तयार करुन खडतर जीवनप्रवासाचा अनुभव सुरुवातीपासुनच दिला जातो. या खडतर प्रवासामध्ये शालेय शिक्षणानंतर च्या उच्च शिक्षणाची सर्व जबाबदारी मुलांनी स्वःतच उचलायची असते. मुलांनी कोणता व्यवसाय किंवा नोकरी करावी याविषयी देखील पालक आग्रही नसतात तसेच त्यांना मुलांच्या भवितव्याची चिंता करण्याची तशी गरज नसते. याचे कारण सुध्दा प्रभावी पालकत्व हेच आहे. मुलांमध्ये सदसद विवेक तसेच व्यावहारिक ज्ञानासोबतच बिकट प्रसंगी निर्णय घेण्याची क्षमता निर्माण होते ती याच प्रभावी पालकत्वामुळे.

Art of Parenting in Pune

Art of Parenting

हा विषय खरच खुप महत्वाचा आणि आपल्याकडे दुर्लक्षिला गेलेला म्हणा किंवा अजुन याचा काही पालकांना गंध ही नाही असे म्हणा, असा आहे. आपली पुढची पिढी पर्यायाने आपल्या देशाचे भवितव्य सध्या पालकांच्या कुबड्यांवरच तयार होत आहे ही अधिक चिंतेची बाब आहे.

माझे एक जुने मित्र काल घरी आले होते. वयाने मला किमान १० वर्षे वडील असतील ते, पण वैचारिक बाबतीत आमच्या तारा चांगल्या जुळतात, काही विषयावर मतभेद देखील आहेत. त्यामुळे आमच्या मध्ये अनेकदा ब-याचदा अनेक विषयावर खुप चर्चा होत असते. व त्या चर्चेमधुन नेहमी काही ना काही तरी चांगलेच बाहेर येते, ज्यामधुन काहीतरी प्रेरणा मिळते, नवीन माहिती मिळते, आपण ज्या तत्वांना चिकटलेले असतो अशी तत्वे अधिक स्पष्ट दिसतात व त्यातील गांभीर्य, त्यातील उच्च मुल्य अधिक प्रखरतेने प्रकट होते. प्रसंगी अशा चर्चांमधुन आपल्यातील काही दोष देखील समजतात.

काल असेच आम्ही एका विषयावर सहज गप्पा मारत माझ्याच घरात बसलो असता, माझा मुलगा धावत माझ्याकडे आला. त्याला ड्रॉईंग पेपर वर एक चित्र काढायचे होते. त्या चित्रामध्ये सुर्य देखील काढायचे त्याने ठरवले होते. बाकी सगळे त्याने त्याला जमेल तसे काढले होते, पण जिथे सुर्य काढायचा होता तिथे मात्र खोड रबरने खोडुन खोडुन कागद अगदी काळाकुट्ट झाला होता. त्याचा गोल गोलाकार होतच नव्हता. तो मला म्हणाला की बाबा मला एक गोल काढुन द्या म्हणजे त्या गोलाच्या भोवतीने तो नंतर छोट्या छोट्या रेषा काढेल आणि मग सुर्य तयार होईल. त्याने असे म्हणायचा अवकाश आणि लगेच माझा हात पुढे सरसावला पेन्सिल आणि ड्रॉईंग बुक घेण्यासाठी. माझे मित्र माझ्या डावीकडे बसले होते. त्याने मध्येच माझ्या हात पुढे करुन माझ्या मुलाचे दोन्ही हात, पेन्सिल व चित्रकलेच्या वही सहीत खाली दाबले जेणेकरुन माझ्या हातात ते येणार नाही. त्यांनी असे का केले असा प्रश्न मला पडेपर्यंत त्यांनी स्वःतहुनच मुलाला सांगितले की तुच गोल काढ. काहीतरी शक्कल लढव, पण तुच काढ.

माझ्या या मित्रवर्यांचे नाव मी मुद्दामहुन लिहित नाही कारण ते प्रसिध्दीपरांमुख आहेत. त्यांना प्रसिध्दी, नावलौकीक वगैरे गोष्टीत अजिबात रस नाही व मी नाव लिहिलेले त्यांना आवडणार देखील नाही. ज्ञानी माणसाचे हेच तर लक्षण आहे.

तस पाहता माझ्या मुलासमोरील समस्या काही फार मोठी नव्हती. आणि मी त्याला मदत केली असती तरी त्याने (माझे आधीचे मते) काहीच फरक पडला नसता. उलट मुलाला गोल काढुन दिला असता तर त्याने राहिलेले  काम लगेच पुर्ण केले असते. गोलाकार गोल काढता येत नाहीये या समस्येवर उपाय शोधुन तो काही लगेच शास्त्रज्ञ वगैरे झाला असता असेही नाही.  हे सगळे विचार मी मदतीचा हात पुढे केला तेव्हा माझ्या मनात आले देखील नव्हते. पालकत्वामध्ये पालकाच्या या छोट्या छोट्या वागण्या बोलण्याचा परिणाम काय होऊ शकतो किंवा काय होऊ शकत नाही असा सुक्ष्म विचार आपण कधी करीतच नाही.

माझ्या मित्राने मुलाला सांगितल्यावर मुलगा पुन्हा माघारी अभ्यासाच्या खोलीमध्ये गेला व त्याच्या कामामध्ये बुडुन गेला. मित्र आणि मी दोघांनी पुनश्च आमच्या गप्पा सुरु केल्या. दहा मिनिटांनी माझा मुलगा पुन्हा आला. यावेळी तो हसत आणि विजयी मुद्रेने चालत येत होता. काकांनी सांगितल्याप्रमाणे त्याने काही तरी शक्कल लढवली होती.  काढलेले चित्र मला न दाखवता त्याने आधी त्याच्या काकांना दाखवले. मग मला. आणि कोणीही न विचारताच ती शक्कल देखील सांगितली. त्याने एक रुपयाचे नाणे त्याच्या आईकडुन घेऊन गोलाकार गोल काढला. पण ही युक्ति सुचण्यापुर्वी त्याने तीन चार वेळा तरी खाडाखोड केलीच होती. म्हणजेच काय तर चुका केल्या होत्या.

Art of Parenting

Art of Parenting

किती साधी आणि सोपी गोष्ट आहे ही! पण पालकत्वामध्ये या गोष्टीला खुप महत्व आहे. प्रभावी पालकत्वामध्ये आपल्या मुलांना चुका करण्याची संधी देणे अनिवार्य आहे हे माझ्या लक्षात आले.

या अनुभवाविषयी अधिक विचार करीत बसलो असता मला माझ्या जडणघडणी ची आठवण झाली. माझ्या आई वडीलांनी, घरातील मोठ्यांनी आमच्या बाबतीत नेमके हेच केले होते. त्यांना कदाचित हे आज ही समजणार नाही की ज्या पध्दतीने आमचे जडणघडण, पालनपोषण केले ते म्हणजे आदर्श पालकत्वाचे एक उदाहरण आहे.

मी कसा घडलो, बिघडलो, पडलो, धडपडलो, पुन्हा उठलो, नवे रस्ते शोधले, पुन्हा पडलो, ठेचा लागल्या, अक्षरशः रक्तबंबाळ झालो. तरीही पुन्हा उठुन आणखी चुका करीत गेलो, व मग मला माझा मार्ग सापडलाच. समस्या संकटे यावर मात करण्याची मनाची तयारी या धडपडण्यामुळेच झाली.

माझ्या पुढच्या लेखांमध्ये मी , माझी यशापशाची, पडण्याधडपड्याची, पुन्हा सावरण्याची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे.

Stay Tuned, Stay Fit & Stay Happy Always.

Facebook Comments

ADD COMMENT

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.