Stay Fit Pune - The weight loss center

healthy eating habits

सावकाश होऊ द्या – भाग १

नुकताच माझ्या एका मित्राच्या लग्नाच्या वाढदिवसाला जाण्याचा योग आला. कार्यक्रम भलताच भारी होता. काय तो रोशनाई, झगमगाट, केक कापणे सगळे अगदी भारी होते. शुभेच्छाची देवाणघेवाण झाल्यावर, साहजिकच आम्हाला जेवणाचा आग्रह झाला. आम्ही जेवणाच्या टेबलापाशी पोहोचलो. पाहतो तर काय पंचपक्वान्न सोडा, इथे तर ३० ते ४० पक्वान्न होते. सोबत एका कोप-यात चॅट चे वेगळे काऊंटर. आईसक्रीम, ज्युस, फालुदा आणि जेवणानंतरची मिठाई यांचे देखील स्वतंत्र काऊंटर. आणि मुखशुध्दीचे पानाचा देखील स्वतंत्र टेबल. माणसाने खायचे तरी काय? ज्याला जे हवे असेल त्याने ते स्वतः उठुन, रांगेत नंबर लावुन , ताटात घेणे आणि पुन्हा बसायला खुर्ची मिळाली तरच बसुन खाणे नाहीतर उभ्या उभ्याच जेवणे. आपल्या पोटाची चिंता आपल्यालाच असल्यामुळे प्रत्येकजण पोटभरण्यासाठी आणि जीभेची रसना भागवण्यासाठी स्वयंस्फुर्तीनेच जेवण करीत असतो.

अर्थात, मी सुध्दा जेवण केलेच. पण एकुणच ह्या अशा कार्यक्रमांमध्ये, जेवण म्हणजे आता स्वतःवर आणि स्वतःच्या पोटावर आणि आरोग्यावर स्वःतहुन केलेला अन्यायच आहे हे समजले. यात त्या मित्राचा दोष नाही. पण समाजव्यवस्थाच अशी झाली आहे की, ट्रेंड प्रमाणे एखादी गोष्ट न करणारा गावंढळ, अडाणी समजला जातो.

ह्या बफेट पध्दतीच्या जेवणातील माणसाचा, माणुस पणाचा टच नाहीसा होतोय. केटरींगवाले खुप चांगले स्वच्छ कपडे घातलेले, प्रसंगी फाडफाड इंग्रजी बोलणारे असतात. पण मला ह्या अशा जेवणावळुयांमध्ये, “सावकाश होऊ द्या ”, असा काळजी व जिव्हाळ्याचा आवाज ऐकु आला नाही.

मी अंदाजे, २ री किंवा ३ री त असेल. मुळशी तालुक्यातील जामगाव माझे गाव. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की, आमचे घरचे कार्यक्रम अगदी ठरलेले असायचे. सकाळी सकाळी दुध भाकरी चुरुन खाल्ली की, आमचा मोर्चा वळायचा नदीकडे. तासनतास आम्ही नदीवर पोहायचो. पोहायचा कंटाळा आला की, तिथेच झाडा-झुडुपांमध्ये खेळायचो. उन्हाळ्यात करवंदाच्या पार्ट्या व्हायच्या. खुप आहे, लहाणपणाविषयी लिहिण्यासारखे, ते पुन्हा कधीतरी. तर, ह्या सुट्ट्यामध्ये आमचा एक-दोन कार्यक्रम पक्के असायचे. पहीला म्हणजे बारशीचे जेवणाची पंगत आणि दुसरा म्हणजे गावातील कुणाचेही लग्नातील जेवणाची पंगत. दोन्ही पंगतींमध्ये जेवायची मजाच लय भारी. त्या काळी जेवणामध्ये पंच पक्वान्न नसायचे गावाकडे. वरण – भात, शाक भाजी, एखादा जिलेबीचा वेढा किंवा मुठभर कळी. (कळी माहित नाही असे शक्यच नाही). पण हे जेवण म्हणजे आजच्या काळातल्या बफेट पध्दतीला कधी ही भारी होते.

पध्दत अशी असायची की, आधी सगळे जण, रांगेत बसायचे. मग जेवण वाढणारे  कार्यकर्ते (तेव्हा गावातील झाडुन सगळी तरुण पोर कार्य तडीस न्यायला मदत करीत.) सर्वात आधी पत्रावळी वाढायचे. पत्रावळ्या देखील इको फ्रेंडली असायच्या. मग मीठ वाढायचे. मग गोड, मग भात, पाठोपाठ वरण आणि भाजी. सर्वांच्या पत्रावळी मध्ये अन्न पोहोचले की मग गावातील एखादा ज्येष्ठ व्यक्ति, मोठ्याने आवाज देऊन, सर्वांना अन्न पोहोचले असल्याची खात्री करुन घ्यायची. सगळी पोहोचले की मग ती व्यक्ति मोठ्या आवाजात “वदनी कवळ घेता..” ह्या श्लोकास सुरुवात करायची. आणि पाठोपाठ सगळे जण, वदनी कवळ घेता म्हणायचे.

श्लोक म्हणायचा झाला की मगच सगळे जेवायला सुरुवात करायचे. कार्यकर्ते अधुन मधुन काय हव काय नको ते विचारायचे. प्रत्येक पंगती मध्ये, एखाद दोन वयस्कर मंडळी, हात मागे कमरेवर ठेवुन कुणास काय हवे काय नको ते विचारीत आणि फिरता फिरता, ते कर्णमधुर वाक्य बोलत. “सावकाश होऊ द्या”. “सावकाश होऊन द्या”.

मी अगदी लहान, शाक भाजी माझी आवडतीची. आणि प्रत्येक पंगतीमध्ये नेमकी मलाच ती कमी मिळायची. त्यामुळे मी आतुरतेने शाकभाजीची वाट बघायचो, आणि त्यात ह्या अशा वयस्कर माणसांचे “सावकाश होऊ द्या” हे शब्द ऐकले की रागच यायचा. एकतर भाजी कमी आणि ती पाठवायची सोडुन सावकाश होऊ द्या काय?

असो. कालच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या जेवणामध्ये, आपल आपण च जेवताना, वाढुन घेताना, “सावकाश होऊ द्या” चे महत्व समजले. सावकाश होऊ द्या ही भावनिक गरज आहे खासकरुन, अशा आधुनिक कार्यक्रमांमध्ये. की जी पुर्णपणे दुर्लक्षित आहे.

मी आहार, फिटनेस या क्षेत्रात काम करीत असल्यामुळे, “सावकाळ होऊ द्या” ची आरोग्या साठीची गरज देखील खुप महत्वाची वाटते. नुसत्या पंगतींमध्येच नाही तर, दररोज, जेवताना कुणीतरी आपल्याला “सावकाश होऊ दे” असे म्हणणारे असावे. पण खरच सावकाश जेवले पाहीजे की वेळ वाचवण्यासाठी पटापट जेवले पाहीजे. आणि सावकाशच का जेवावे, याचे फायदे काय असतात, पटापट खाल्याने काय त्रास, धोके असतात,मांडी घालुन बसुनच का जेवण करावे,  हे सर्व जाणुन घेण्यासाठी, माझा पुढचा लेख आवर्जुन वाचा.

Facebook Comments

Comments
ADD COMMENT

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.