
दिवाळीच्या फराळावर ताव मारण्यापुर्वी हे अवश्य वाचा
पुर्वीची दिवाळी
मला आठवतय माझ्या लहानपणी आम्ही सारे भावंड दिवाळीची अगदी आतुरतेने वाट पहायचो. आम्हा मुलांसाठी सर्वात महत्वाचे असायचे ते म्हणजे दिवाळी निमित्त मिळणा-या २१ दिवसाच्या सुट्ट्या. कधी एकदा शाळेतील प्रथम सत्राची परिक्षा संपते व कधी गावी मनसोक्त उंदडायला, भटकायला जातोय असे व्हायचे.
आम्ही बालगोपाळ दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आमच्या बाल उद्योगामध्ये इतके काही रमुन जायचो की आम्हाला वडीलधा-यांचे काय सुरु आहे हे समजायचे देखील नाही. आमचे लक्ष किल्ले बनवणे, त्या किल्ल्यावर ठेवण्यासाठी दरवर्षी नवीन चित्रे (किल्ल्यावर ठेवायची चित्रे माहित नसेल तर समजा तुम्ही बालपण जगलाच नाही !!!), किल्ल्यावर पेरण्यासाठी हाळीव आणणे, ती पेरणे, किल्याला दररोज संतुलित पाणी फवारणे, जेणे करुन हाळीव रुजुन किल्ला हिरवागार होईल, या व अशा सर्व गोष्टींमध्ये असायचे. कधी कधी गावातील मित्रांसोबत तुझा किल्ला भारी की माझा किल्ला भारी अशा प्रकारची अघोषित स्पर्धा देखील व्हायची. वेळात वेळ काढुन मग नदीवर पोहायला जाणे, कधी डोंगरावर जाणे, कधी गाई गुरांना घेऊन रानावनात चरायला जाणे असे आमचे सगळे उद्योग आमच्या आई वडीलांच्या अपरोक्ष, त्यांच्या मदतीशिवाय व सुपरव्हिजन शिवाय चालायचे. हल्ली किती आईवडील मुलांना असे मोकळे सोडुन देतात? हा वेगळा विषय आहे. पुन्हा कधीतरी या विषयावर चर्चा करुयात आपण.
असो. आमचा मुलामुलांचा हा उद्योग आम्हाला खुपच दमवुन टाकायचा. व अशाप्रकारे थकुन, दमुन घरी आल्यावर आम्ही ताव मारायचो दिवाळीच्या फराळावर. दिवाळीचा फराळ थोडा जपुन खाणे वगैरे असे काही नसायचे, अक्षरशः तावच मारायचो आम्ही दिवाळी फराळावर! तुम्ही सुध्दा असेच केले असेल कदाचित तुमच्या बालपणी.
आता मला आठवतय, आम्ही ज्यावेळी अशाप्रकारे खेळण्यात मग्न असायचो त्यावेळी आमच्या गावातील मोठी माणसे, स्त्री पुरुष, भात काढणीच्या कामाला जुंपलेली असायची. रात्रंदिवस भाअत काढणे, त्याच्या शिगा लावुन ठेवणे, मग थोडे वाळल्यावर, खाचरातुन काढलेले भात बाहेर खळ्यात आणायचे व मग भात झोडणी. झोडणी झाल्यावर पाखडुन घेऊन, खळ्यात भाताची रास लागायची. या भाताच्या राशीकडे पाहुन शेतक-यास जो काही आनंद मिळत असेल की विचारुच नका. मी स्वःत माझ्या डोळ्यांनी हे सारे माझ्या बालपणी पाहिले आहे. मग या भातराशीतले भात पुन्हा उन्ह देऊन वाळवणे, मग कणग्या, पोती भरुन, बैलगाडीमध्ये थप्प्या लावुन हे भात पिक घरी आणले जायचे. घरी आई ताटात हळदी कुंकू आणि पाणी घेऊन यायची बैलगाडीला सामोरी. बैलांच्या पायावर, गडीमाणसांच्या पायावर पाणी सोडुन, भाताच्या पोत्यांना हळदी कुंकू वाहुन मगच हे धनधान्य घरात साठवणीसाठी घेतले जायचे. भात लावणी ते भात काढणी या सगळ्या मध्ये शेतक-यास अनेक कामे करावी लागत. ही सर्व कामे अंग मेहनतीची कामे होती. “होती” असे म्हणण्याची वेळ सध्या आपल्यावर आली.
मग एवढी कष्टाची कामे करुन, भरपुर कॅलरी जाळुन या माणसांनी दिवाळीच्या फराळावर ताव मारला तर कुठ बिघडणार होत. अंगमेहनतीच्या अशा अविरत कामांमुळे आपल्या पुर्वजांचे चयापचय म्हणजेच मेटॅबॉलिज्म सॉलिड होते. जे काही खाऊ ते पचवु अशा प्रकारचा पिंडच होता त्यांचा. त्यामुळे फराळावर “ताव” मारणे म्हणजे एक पर्वणीच होती त्यांच्या साठी.
“होती” असे म्हणण्याची वेळ सध्या आपल्यावर आली आहे कारण, पुर्वीसारखा चार्म आता राहिला नाही या सर्वांमध्ये. हल्ली सगळी कामे मशीनरी ने होऊ लागली आहेत. ब-याच शेतकरी कुटूंबात घरातील स्त्रीपुरुष शेतातील कामे करीतच नाहीत. हल्ली कामे करण्यासाठी मजुर अड्ड्यावरुन मजुर आणले जातात. चित्र बदलले आहे.
हे बदलले चित्र म्हणजेच आपली बदलेली जीवनशैली. शहरात कुठे आहेत हो आता अशी कामे करणारी माणसे किंवा अशी भात शेते? शहरातच काय, गाव खेड्यांमध्येदेखील अवस्था अतिशय बिकट होत चालली आहे. दुर दुर्गम खेड्यापाड्यांत तरुण मंडळी अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच राहीयेत. जास्त संख्येने आहेत ते वयस्कर म्हातारे कोतारे पुराण पुरुष व स्त्रिया. या वयस्कर मंडळी शहरात राहायला जमत नाही आवडत नाही किंवा काही प्रसंगी तरुण सुना-भावजयांना म्हातारी माणसे शहरात नको असतात. म्हणुन काय आहेत तेवढी माणसे गावाकडे शिल्लक आहेत. वास्तव खुपच बिकट आहे मित्रांनो.
आणि एवढे सगळे करुन, दिवाळी आली की आपली लगबग सुरु होते ती दिवाळीच्या तयारीची. लहान मुलांना बाजारातुन किल्ले आणुन दिले जातात. नदी डोंगर शेत तर दुरच. अगदीच मुलांना कुठे फिरायला न्यायचे म्हंटले तरी पालक एखाद्या सुपरवायझर प्रमाणे “हे करु नकोस, तिकडे जाऊ नकोस, उडी मारु नकोस, पडशील, सावकाश” अशा नाना सुचना वजा आज्ञा मुलांस देत असतात.
पण आपण आपल्या परंपरा मात्र अजुन ही शाबुत ठेवल्या आहेत. दिवाळी आली की दिवाळीचा फराळ मात्र घराघरात न चुकता येतो. “येतो” असे म्हणायचे कारण असे की, बहुतांश गृहिणी दिवाळीचा फराळ विकतच आणतात. व येणा-या पाहुण्यांना, तसेच घरातील सर्वांना आग्रहाने प्रेमाने खाऊ घालतात, स्वःत ही खातात.
कधी कधी हे फराळ खाणे नुसते खाणे राहत नाही. इथे देखील “ताव मारणे” आपोआप होते.
आता मला सांगा मित्रांनो, आपण खरोखर दिवाळीच्या फराळावर ताव मारला पाहिजे का? आपण खरोखर अंगमेहनतीची कामे नियमित करतो का? शेत सोडा, जिम मध्ये तरी आपण दररोज एक दिड तास व्यायाम रोज करतोय का?
नाही ना? मग दिवाळीच्या फराळावर ताव कसला मारताय? थांबा !!!!!
कळावे
आपले निरामय आयुष्याचे सांगाती
महेश व पल्लवी ठोंबरे
टिप – दिवाळी फराळ आणि आरोग्या संबंधीचा माझा पुढचा लेख नक्की वाचा.
Sujata
Ekadam sundar . Lahan panachi aatavan aali