Stay Fit Pune - The weight loss center

आरोग्यदायी दिवाळी

मागील लेखात आपण दिवाळी च्या फराळावर ताव मारण्या संदर्भात काही रोचक माहिती पाहिली होती. फराळावर ताव मारणे म्हणजे मनसोक्त फराळ खाणे सध्याच्या काळात आपल्यासाठी कसे योग्य नाही याविषयी चा लेख अनेकांना आवडला व त्यांनी मला फोन, मेसेज करुन नक्की काय सुधारणा कराव्यात या विषयी विचारणा केली. आपल्या वेब साइटचा वाचक वर्ग खुप मोठा आहे. व अनेक क्षेत्रातील अनेक तज्ञ देखील आपले ब्लॉग वाचत असतात. सर्वांनी केलेल्या कौतुकाचे सर्वप्रथम आभार.

दिवाळी कशी साजरी करावी या विषयी मार्गदर्शन करण्याइतका अधिकारी मी नक्कीच नाहिये. पण दिवाळीतील फराळाविषयी क्षीर-नीर पृथ्थकरण मी नक्कीच करु शकतो. माझ्या आज पर्यंतच्या अनुभव व मिळवलेल्या ज्ञानातुन मी लिहित आहे.

दिवाळीच्या फराळ कसा असावा या माहिती करुन घेण्याआधी, आपण दिवाळीच्या फराळाची पार्श्वभुमी, परंपरा काय आहेत , होत्या त्या थोडक्यात जाणुन घेऊयात.

भारतवर्षामध्ये दिवाळी / दिपावली कधीपासुन साजरी केली जात असेल? काही अभ्यासकांच्या मते हा सण पुराणकाळापासुन साजरा केला जातोय. तर काही वेद उपनिषदांचे अभ्यासक मानतात की दिवाळी हा सण उपनिषद काळापासुन साजरा केला जातोय. उपनिषदातील गृहसंस्कार नामक रुढींमध्ये तीन पाकयज्ञ सांगितले आहेत. पार्वण पाकयज्ञ, आश्वयुजी पाकयज्ञ व आग्रयण पाकयज्ञ. या तीन ही पाकक्रिया किंवा पाक संहितांनी मिळुन दिवाळीची वैशिष्ट्येपुर्ण पाकसंहिता अगदी उपनिषद काळापासुन निर्मिली गेली आहे. या मध्ये विविध धन धान्यांच्या रुचकर तसेच आरोग्यवर्धक पाककृती सांगितलेल्या आहेत. आपल्या पुर्वजांचे ज्ञान, अध्यात्म, प्राचीनता जगभर प्रसिध्द आहेच. पण पाककृतींमधील इतके वैविध्य व ते ही संहिता, लिखित पाककृतींच्या रुपात जगात अन्य कुठे ही पहायला मिळणार नाही.

तुम्हाला माहित नसेल पण आपल्या कडे पाकशास्त्रावर प्राचीन काळात ग्रंथनिर्मिती झालेली आहे. क्षेमकुतूहल, भोजनकुतूहल या सारखे निव्वळ पाकशास्त्रावरील ग्रंथ ते ही हजारो वर्षांपुर्वी भारतात तयार झाले आहेत. सध्या आपण दिवाळीचे जे काही फराळाचे पदार्थ करतो (स्वःत बनवत कुणी नाही, विकत आणता ना तुम्ही सुध्दा ? )खातो त्या सर्वांची नावे या प्राचीन ग्रंथामध्ये आढळतात.

अकराव्या शतकामध्ये अल-बरुनी नावाचा, महमद गजनवीचा एक वकील भारतात आला होता. तो स्वःत एक अभ्यासक लेखक होता. त्याने भारतात त्याला दिवाळी हा सण भारतीय लोक आनंदाने साजरा करताना दिसले. तसे त्याने ते त्याच्या भारत दर्शन नावाच्या ग्रंथामध्ये लिहिले सुध्दा आहे. या प्राचीन ग्रंथांमध्ये दिवाळी फराळाला बनवले जाणारे खाद्यपदार्थ आहेत पुढीलप्रमाणे: अपूप (अप्पे/घारगे), शालिपूप (अनारसे), शंखपाला (शंकरपाळे), सम्पाव (सारोटी), मधुशीर्षक (खाजे), शष्कुली(करंजी), चणकपुरीका (बेसनाच्या तिखट पु-या),मुद्गलड्ड (मुगाचे लाडू), सेविका (शेवया), चक्रिका (चकली) वगरे-वगरे! या खाद्यपदार्थाची नुसती यादी वाचली तरी आपल्या आहार परंपरेची संपन्नता ध्यानात येते आणि बर्गर-पिझ्झा अशा अर्धवट पदार्थाचं कौतुक करणा-यांची कीव येते. याचा अर्थ, ज्या लोकांना वेद, उपनिषद पुराण यांच्या प्राचीनत्वावर शंका आहे, त्यांच्यासाठी आपल्या या सणाचा इतिहास किमान एक हजार वर्षे मागे जातोच जातो.

पण तरीही अजुन एक प्रश्न उपस्थित होतो. तो म्हणजे या सणात खाद्यपदार्थांची इतकी रेलचेल करण्याचे कारण काय असेल?

या मागे निसर्ग हे कारण आहे. निसर्गातील यच्चयावत सर्वच्या सर्व प्राण्यांच्या अंगी एक विशेष गुण आहे. तो म्हणजे हिवाळ्यात, ज्यावेळी अन्न मुबलक उपलब्ध असते, त्यावेळी भरपुर अन्न खावुन ते अन्न चरबीच्या रुपात शरीरात साठवुन ठेवणे. पुढे उन्हाळा, पावसाळ्यामध्ये जेव्हा अन्न पदार्थाची चणचण असते तेव्हा ही शरीरात साठवलेली चरबीच कामी येते. ही नैसर्गिक प्रवृत्ती आजही आपण अनेक प्राण्यांमध्ये पाहतो.

पुणे मध्ये वजन कमी करण्यासाठी तज्ञ

अस्वल हिवाळ्याच्या काळात, मासे खुप मोठ्या संख्येने उपलब्ध असताना त्यावर ताव मारते

निसर्गातील ही उपजत वृत्ती माणसात अतिप्राचीन काळी नसेल कशावरुन? आणि जरी नसली तरी मनुष्य निसर्गातील अन्य प्राण्यांकडुन शिकु नक्कीच शकतो. पण हल्लीच्या काळात खरच का आपणास कधी अन्न पदार्थांची कमतरता जाणवणार आहे? मग इतकी चरबी साठवुन ठेवायची तरी कशासाठी?

त्यामुळे दिवाळी म्हणजे हिवाळ्याची सुरुवातच. व हिवाळ्यात जास्तीत जास्त अन्नसाठा चरबीच्या रुपात आपल्या शरीरात करुन ठेवणे हा मुलभुत हेतु आहे खाद्यपदार्थांच्या इतक्या रेलचलीचा, दिवाळ सणात.

चला आता आपण पाहुयात दिवाळीत नेमके कोणते फराळाचे पदार्थ केले पाहिजेत व त्यातील मुख्य घटक काय असले पाहिजेत व कोणते घटक टाळले पाहिजेत. अगदीच कुणाला माहितच नसेल तर त्यांनी खालील वेबसाइट वर पहावे.

मला वाटते आपल्याला कोणते पदार्थ करावेत याविषयी सांगण्याची काहीही गरज नाहिये. आपल्या परंपरेनुसार आपण जे काही आजवर करत आलो आहोत तेच करायचे आहेत. फक्त एक काळजी घ्यायची. ती म्हणजे मैदा व साखर यांचा वापर न करणे. मैद्याऐवजी तांदूळ, नाचणी, गहू, मूग आदी धान्यांचा वापर करा. साखर तर अजिबात नको, त्याऐवजी अर्थातच गुळाचा वापर करा. होता होईतो तळलेले पदार्थसुद्धा नको. वरील वेबसाईट वर ज्या काही रेसीपीज दिलेल्या असतील त्यामध्ये साखर लिहिले असेल तर गुळ असे वाचा व मैदा लिहिले असेल तर तांदुळ, गहु, नाचणी आदीन्चे पीठ वाचा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा फराळ कष्ट-परिश्रम करणा-यांसाठी आहे, हे विसरू नका.

कोणत्या पदार्थामध्ये किती कॅलरीज आहेत हे खालील तक्त्त्यावरुन तुम्हाला समजेल.

वजन कमी करण्याचे सोपे उपाय पुणे

 

 मुळात परिश्रम नाहीच, व्यायाम केलाच तर तो एसी जिममध्ये जाऊन, घाम न काढता केलेला व्यायाम कसा हो? व्यायाम नाहीच. तर भरपूर चाला. दिवसाला निदान ५००० पावलं तरी चाललं पाहिजे. तुमच्यातले अनेक जण दिवसाला १००० पावलं सुद्धा चालत नसतील. त्यांनी कशाला खावा पौष्टिक दिवाळी फराळ?

प्रश्न जरा तिरसट असला तरी सत्य आहे. आणि ज्यांना फराळ खायचा आहे त्यांनी लागलीच व्यायामाला आपल्या जीवनशैलीचा भाग बनवले पाहिजे.

तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

कळावे

आपले निरामय आयुष्याचे सांगाती

महेश व पल्लवी ठोंबरे

Facebook Comments

ADD COMMENT

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.