
मधुमेह – पुर्वाध
फ्लॅशबॅक –
मधुमेह ह्या विषयावर लिहिण्यापुर्वी, मला माझ्या काही जुन्या आठवणी जाग्या कराव्याशा वाटताहेत. माझ्या करीयरची सुरुवातीची अनेक वर्षे मी राजकारण व समाजकारण करण्यात घालवली. ह्या कालावधी मध्ये, मी अनेक व्यक्ति आणि वल्लींना भेटलो. मला एक वैशिष्ट्यपुर्ण सामाजिक आणि राजकिय वारसा लाभलेला असल्याने व मुळातच समाजाच्या समस्यांचे समाधान करण्याकडे जास्त कल असल्याने, माझी भेट समाजातील अत्यंत निम्न स्तरावरील कार्यकर्ते, नागरीक यांच्याशी होत असे.
माझ्या राजकीय कारकिर्दीतील जुन्या आठवणींना उजाळा दिला की मला अनेक आरोग्य रहस्यांचा उलगडा आज होतोय. अनेक खेडोपाडी मी जात असे. ग्रामीण भागातील कष्टकरी वर्ग ते त्याच ग्रामीण भागातील पुढारी वर्ग यांच्यांशी गाठीभेटी नेहमीच्याच होत्या. त्या सोबतच, सिंबायोसिस सारख्या महाविद्यालयात शिक्षण झाल्यामुळे मला आधुनिक टच देखील आहेच.
या सगळ्या पार्श्वभूमीवर, आपोआपच मी एक तुलनात्मक अभ्यास केला. त्याविषयी थोडे लिहितो.
मला आठवतय, २००९ च्या सुमारास, मी एका शासकीय योजनेची माहीती ग्रामीण भागात पोहोचवण्यासाठी मुळशीतील एका दुर्गम अशा धनगर पाड्यावर गेलो होतो. त्या पाड्यावर एक वयोवृध्द आजोबा भेटले. त्यांना त्या योजनेची माहीती सांगितली. पण एकंदरीतच, त्यांच्या प्रतिसादावरुन असे जाणवले की त्यांना अशा योजना , अनुदाने यामध्ये फारसे स्वारस्य नव्हते. त्यांना घाई होती. उन्हाळ्याचेच दिवस असल्याने, त्यांना वळवाच्या पावसाच्या आधीच त्यांच्या शेतात भातरोपांचा रोपटा (रोप करण्याची जागा) भाजुन घ्यायचा होता. घाई असल्यामुळे ते गेले. मी जाताना त्यांना पहात होतो. वय अंदाजे ६० च्या आसपास असेल. तरीही अगदी पटापट पावले टाकीत ते, रणरणत्या उन्हामध्ये शेताकडे निघुन गेले. त्यांचा मुलगा पाच दहा मिनिटांत येईल असे ही मला जाता जाता सांगितले. मी, माझ्या कार्यकर्त्या मित्रांसोबत, तिथेच त्यांच्या झोपडीपाशी त्यांच्या मुलाची वाट बघत बसलो. त्याचा मुलगा, वय अंदाजे, ३५ ते ४० च्या आसपास असेन, आला. पहील्यांदा पाहील्यावर असे वाटले की हा त्यांचा मुलगा नसावा कदाचित. लहान भाऊ असेल. पण चर्चा सुरु झाल्यावर तो मुलगाच असल्याची खात्री झाली. माहीती देता देता, माहिती घेतली सुध्दा. त्या आजोबांचा हा मुलगा, पिरंगुटला राहायला असायचा. तिकडेच एका खाजगी कंपनीत नोकरी देखील करायचा. पोर बाळ देखील पिरंगुटलाच शाळा शिकायची त्याची. महीना पंधरा दिवसांनी गावी यायचा व आई वडीलांची भेट घेऊन जायचा.
त्या मुलाला (आजोबांचा मुलगा) त्या शासकीय योजनेची माहीती सांगुन झाली. आम्ही माघारी निघणार इतक्यात त्याने जेवणाचा आग्रह केला. त्याच्या त्या कौलारु घरातच आमची ताट वाढली गेली. जेवण सुरू करणार इतक्यात त्याने, एक इंजेक्शन काढुन, स्वतःच्याच हाताने, कमरेची चरबी, एका चिमटीमध्ये धरुन स्वतःच्याच हाताने, स्वःतला इंजेक्शन टोचले.
काय प्रकार सुरू आहे, हे मला समजेना व माझा गोंधळलेला चेहरा बघुन त्यानेच सांगितले.
“सुगर आहे मला. त्यामुळे रोज सकाळ संध्याकाळ इंजेक्शन घ्यावे लागते.”
मला त्यावेळी त्या गोष्टीचे नीटसे आकलन झाले नव्हते.
मी विचारप्रवृत्त झालो…
तीन-चार वर्षापुर्वी, म्हणजे मी फिटनेस कोचिंगचे काम सुरु केल्यानंतरच्या काळात , पुन्हा एकदा त्या मुलाची (त्या आजोबांचा मुलगा) भेट झाली. व मला तो पुर्वीचा प्रसंग आठवला. व मी त्याला आवर्जुन विचारले की तुला डायबेटीज कसा काय? काय तुझ्या वडीलांना, आजोबांना, आई किंवा गावाकडच्या नातेवाईकांना, आणखी कुणाला डायबेटीज होता किंवा आहे काय? त्यावर तो म्हणाला की घरात किंवा गावाकडच्या कोणत्याही नातेवाईकांस डायबेटीज नाही. व त्यालाच मधुमेह म्हणजेच डायबेटीज असल्याचे निदान पुर्वी झाले होते. व अजुनही तो इंजेक्शन वर शुगर कंट्रोल करीत आहे. पुढे तो हे देखील म्हणाला की त्याच्या कंपनी मध्ये काम करणा-या अनेकांना हा आजार झालेला त्याला माहीत आहे.
मला त्याचे ते साठीच्या आसपासचे वडील आठवले, की जे ह्या वयात देखील एखाद्या तरुणास लाजवतील असे कष्ट करतात. त्या वडीलांस किंवा त्या कष्ट करणा-या पीढीला डायबेटीज ने कधी घेरले नव्हते. मग नंतरच्या पीढीलाच डायबेटीज ने इतके कसे काय चिंतातुर केले आहे?
मी राजकीय क्षेत्रात काम करीत असताना, माझ्या सोबतचे काही कार्यकर्ते, की ते तेव्हा तरुण तडफदार होते, अशांना हल्ली भेटण्याचा योग देखील येतोच. माझ्या त्या कार्यकर्त्या मित्रांपैकी अनेकांनी कष्टाची कमाई कमावलेली अगदी प्रथमदर्शनीच जाणवते. व अशी कष्टाची कमाई असलेल्यापैकी जवळ जवळ ९०% मित्रांना मधुमेह डायबेटीज ही झालेला आहे असे समजते. ह्या कष्टाच्या कमाईचा आणि मधुमेहाचा काही संबंध आहे का?
तशीच काहीशी अवस्था, माझ्या कॉलेजमधील, काही मित्र मैत्रिणींची आहे.
यक्ष प्रश्न – मधुमेह म्हणजे काय?
काही सर्व्हे म्हणतात की भारतात दर तीन माणसांमध्ये एकास डायबेटीज आहे किंवा होणार आहे. डायबेटीज ला वयाचे वावडे नाही.. तीन महिन्यांपुर्वी आलेल्या एका बातमीने तर भारताला अक्षरक्षः हलवुन टाकले. वय वर्षे २ असलेल्या एका बालकास मधुमेहाने ग्रासल्याची ती बातमी होती.
डायबेटीज कुणालाही होऊ शकतो. डायबेटीज म्हणजे नक्की काय? त्याची लक्षणे काय? कारणे काय? उपचार काय? या विषयी आवर्जुन वाचा माझी खास डायबेटीज वरील ही लघुलेख माला. तसेच डायबेटीज होऊ नये म्हणुन काय केले पाहीजे हे देखील समजुन घ्या, माझ्या पुढच्या लेखात.
कळावे,
आपला निरामय आयुष्याचा सांगाती
महेश ठोंबरे – 9923062525
पल्लवी ठोंबरे – 9765702525
Amol Chirke
pudhacha lekha kadhee yenar.
Pingback: मधुमेह...नको नको – Stay Fit Stay Happy
Pingback: मधुमेह आजार की सुवर्णसंधी? – Stay Fit Stay Happy