Stay Fit Pune - The weight loss center

“नीट” चालते व्हा !!

आपण चालण्याचे फायद्यांविषयी खुप काही वाचले ऐकले पाहिले असेल. अगदी सर्वांना निर्विवाद पणे हे मान्य आहे की नियमित चालण्याने आपणास खुप लाभ होतात. त्यामुळे चालल्यामुळे काय फायदे होतात या विषयी मी काहीही लिहिणार नाहीये. चालायचे कसे याविषयी मी आज महत्वाची माहिती आपणा सर्वासोबत शेयर करणार आहे.

आपण सगळेच चालतो. बरोबर ना? आणि आपण अगदी दररोज चालतो. कमी अधिक प्रमाणात का होईना आपण दररोज किमान दोन ते अडीच हजार पावले चालत असतोच. प्रत्यक्षात आपण चालले पाहिजे किमान १० हजार पावले दररोज. वयाच्या पहिल्या वर्षापासुन आपण चालतो आहोत. चालणे ही आपली मुलभुत क्रिया आहे की जी आपणास कुणीही शिकविलेली नसते तरी देखील आपण चालावयास शिकतोच. व पुढे आयुष्यभर आपण चालत राह्तो.

हल्ली हल्ली आपले चालण्याचे प्रमाण कमी झाले आहे. इथल्या इथे जरी दुकानात काही विकत आणण्यासाठी जायचे असेल तरी आपण हल्ली गाडी वापरतो. या व अशा सवयींमुळे आपले चालणे कमी झालेले आहे. आजही खेडोपाडी दुर्गम भागात लोकांना चालावेच लागते. अगदी छोट्या छोट्या गरजांसाठी चालणे महत्वाचे आहे अनेकांसाठी. त्यांना जगण्यासाठी चालावे लागते. आणि त्या चालण्यानेच खेडोपाडी असलेले लोक म्हातारपणात देखील चालत असतात.

शहरीभागामध्ये चालणे हा एक वेगळा कार्यक्रम झालेला दिसतो. रोज सकाळी फक्त चालण्यासाठीच अनेक नागरीक चालताना आपण पाहतो. अर्थातच त्यांना चालण्याचे महत्व समजलेले आहे म्हणुनच ते चालतात. आपण ही चालतो. मी चालतो आणि तुम्ही देखील चालत असताच.

पण प्रश्न आहे की काय आपण खरोखर व जसे चालले पाहिजे तसेच चालतो का?

कित्येकदा काही लोक इतरांचे लक्ष विशेष वेधुन घेतात ते केवळ त्यांच्या चालण्याच्या पध्दतीमुळे , चालण्याच्या स्टाईलमुळे. काही लोकांची स्टाईल अगदीच विचित्र असते. व ही विचित्र पध्दत भविष्यकाळात त्यांच्यासाठी अनेक दुर्धर अशा आजारांना निमंत्रण देत असते. चुकीच्या पध्दतीने चालण्यामुळे आपल्या सगळ्याच अवयवांवर विपरीत दुरगामी परीणाम होत असतात. हे परिणाम किंवा धोके आता समजत नाहीत पण पुढे यांचा खुप त्रास होत असतो.

चालण्याच्या चुकीच्या सवयीमुळे पाठीचे दुखणे, मणक्यांचे विकार, मानेचे दुखणे, गुडघे दुखणे, नडघीचे सांधे दुखणे असे अनेक आजार उतारवयात सुरु होतात. काही तरुणांना देखील अशा आजारांना बळी पडावे लागते.

आपण ज्यावेळी चालण्याच्या क्रियेमध्ये असतो त्यावेळी आपल्या शरीरातील जवळ जवळ सगळ्याच अवयवांना व्यायाम मिळत असतो. अनेक अवयवांवर ताण येत असतो. कित्येकदा आपल्या त्या त्या अवयवांवर ताण आलेला चांगला देखील असतो. पण जर चालण्याची पध्दत चुकीची असेल तर मात्र हा ताण पुढे जाऊन त्या त्या अवयवास निकामी करण्याचे काम करतो. उदाहरण पहायचे झाले तर चालताना पायाच्या टाच व बोटांची दिशा सरळ रेषेत न राहता जर ती बहिर्गामी म्हणजेच बाहेरच्या बाजुला जात असेल तर आपल्या टाचेच्या वरच्या (म्हणजे नडघीच्या खाली असलेल्या) सांध्यांवर खुप ताण येतो व म्हातारपणी तो भाग दुखायला सुरुवात होते. तसेच पाठीच्या कणा देखील सरळ रेषेत असावयास हवा, अनेकांचा तो नसतो. जर पाठीचा कणा वाकडा होत असेल चालताना तर मणक्याचे विकार लवकरच सुरु होतात.

संभाजी महाराजांना शिकवण देताना समर्थ रामदास स्वामी आवर्जुन “शिवरायांचे कैसे चालणे” याकडे युवराजांचे लक्ष वेधुन घेतात ते उगाचच नाही.

चला तर मग पाहुयात योग्य रीतीने चालणे म्हणजे नक्की काय?

चालावे कसे?

चालावे कसे?

 • आपले खांदे मोकळे आरामशीर व मागे झुकलेले असावेत.
 • सरळ उभे राहुन छाती थोडी पुढे काढुन, पाठीचा कणा सरळ ठेवणे गरजेचे आहे
 • ट्रेकींगची सॅक पाठीवर घेऊन थोडे चालण्याने देखील दोन्ही खांद्यावर समान वजन येऊन ते योग्य स्थिती मध्ये येऊ शकतात.
 • चालताना हात हलवत चालणे खुप महत्वाचे आहे. यामुळे खांद्याच्या स्नायुंना देखील व्यायाम मिळतो व नैसर्गिक रीत्या शरीराचे संतुलन राखले जाते.
 • माण देखील सरळ असावी, व हनुवटी थोडीशी खाली झुकलेली असावी
 • आपले दोन्ही नितंब समान पातळीवर असावेत. गुडघे समोरच्या दिशेला आणि ओटी पोट आपल्या छाती व पोटाच्या आत खेचलेले असावे.
 • आपली पावलांमधील अंतर समान हवे
 • सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या पायांची दिशा. टाच व बोटे हे नेहमी सरळ रेषेत समोरच्या दिशेला असावेत. अनेकांची ही दिशा बाहेर असते किंवा क्वचित लोकांची ती आतल्या दिशेला सुध्दा असते. पाय समोर सरळ दिशेत असणे गरजेचे आहे.
 • पाऊल टाकण्यासाठी जोर आपल्या हिप्स मधुन आला पाहिजे. म्हणजे पाय पुढे ढकलला गेला पाहिजे

या गोष्टी टाळा

 • आपले डोके व माण कोणत्याही एका बाजुला झुकलेली असु नये. सरळ असावी
 • खांदे पुढे झुकलेले नसावेत
 • चालताना पाय उचलुन खेचुन पुढे टाकु नये. हिप्स च्या सांध्यामधुन पुढे ढकलला जावा.
 • पायाची बोटे आधी जमिनीला टेकता कामा नये. आधी टाच टेकली पाहिजे व मग बोटे. टाच टेकल्यानंतर चेंडु ज्याप्रमाणे गोल फिरतो त्या प्रमाणे टाच मग टाचेच्या पुढचा भाग आणि मग बोटे एका पाठोपाठ जमिनीस टेकली पाहीजे

चालण्याचे फायदे आहेतच. पण योग्य रीतीने चालण्याचे खुप जास्त फायदे आहेत.

चला तर मग चालते व्हा मित्रांनो!

Facebook Comments

ADD COMMENT

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.