
पावसाळा आणि कोविड-१९
या वर्षी मार्च महिन्यात जेव्हा कोरोनाचा भारतात शिरकाव होत होता तेव्हा आपल्याकडे सर्रास असे तर्क-वितर्क मांडले जात होते की भारतातील कडक उन्हाळ्या कोरोनाच्या क्षमतेवर प्रतिकुल परिणाम होऊन कोरोनाचा प्रसार कमी होण्यास मदत होईल. थंड वातावरणात कोरोनाची ताकद वाढते व प्रादुर्भाव जास्त होतो, हे व असे अनेक तर्क आपण सर्वांनी वाचले, पाहिले, ऐकले.
पण प्रत्यक्षात असे काहीही होताना आपणास दिसले नाही. उलट कोरोनाचा प्रसार वाढतच गेला. आता स्थिती अशी आहे की आपल्या अवतीभवतीच्या कोणत्याही व्यक्तिस, नव्हे नव्हे खुद्द आपणास देखील कोरोना झालेला असेल किंवा होऊन गेलेला असेलही. कोरोनाची टेस्ट जोपर्यंत केली जात नाही तोपर्यंत कुणालाच समजत नाही की आपणास याचा प्रादुर्भाव झालेला आहे किंवा नाही. पण सुरुवातीचे जे तर्क वितर्क होते उन्हाळा व कोरोनाचा प्रसार ते मात्र सपशेल चुकीचे ठरले आहेत हे भारतातील कोरोनाच्या वाढलेल्या आकडेवारीवरुन स्पष्ट दिसुन येते आहे.
आता प्रश्न आहे की काय पावसाळ्यात कोरोनाचा प्रसार असाच वाढत जाईल की कमी होईल की आता ज्या गतीने होत आहे त्यापेक्षाही जास्त गतीने प्रसार होईल. एखाद्या उघड्या मैदानावर, रस्त्यावर, बाकावर, फुटपाथवर जर कोरोनाचे विषाणु असतील व पाऊस पडला तर काय कोरोनाचे विषाणु या पावसामुळे नष्ट होतील? ज्याप्रमाणे पावसाळ्यात डेंग्यु, मलेरीया, चिकुन गुणीया आदी रोगांच्या साथी येतात काय तशाच प्रकारे कोविड-१९ ची साथ देखील काय पावसाळ्यात जोर धरेल? पावसाळ्यात साहजिकच तापमान थोडे कमी होते, वातावरणात आर्द्रता वाढते ; वातावरणातील अशा बदलांचा आणि कोरोना विषाणुचा काही संबंध आहे का?
असे अनेक प्रश्न मला पडले. साहजिकच तुम्हालाही पडले असतीलच असे प्रश्न!
या प्रश्नांचा धांडोळा घेण्यासाठी मी अभ्यास केला. अनेक वेबसाईट्स, ब्लॉग्स वाचले. अनेक शास्त्रज्ञांचे लेख वाचले, पेपर्स पडताळले. मी केलेल्या या अभ्यासातुन मला जे काही समजले ते मी आपणा समोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहे.
- कोरोना विषाणुचा आणि पावसाचा काही संबंध आहे की नाही या बाबतीत ठोस मत मांडण्यासाठी शास्त्रज्ञांना किमान पाच ते सहा पावसाळे एवढा अवधी लागणार आहे. तर आणि तरच या विषयी पक्के मत मांडता येऊ शकते.
- हा संबंध शोधण्यासाठी तुर्त तरी इतर आजारांचा व पावसाचा जो संबंध आहे त्या आकडेवारीचा उपयोग केला जात आहे. असे अनेक अभ्यास प्रकाशित केले गेले आहेत की ज्यामध्ये व्हायरल आजारांचा आणि पावसाळ्याचा संबंधावर प्रकाश टाकला आहे. भारतात प्रदेशानुसार या साथीचे स्वरुप, व्यापकता बदलत असते. पण पावसाळ्यात विषाणु-साथीचे आजार इतर ऋतुंच्या तुलनेत जास्त असतात. पण हे निरिक्षण लागलीच तरी कोरोना विषाणुला लागु होत नाहीये.
- नुसत्या पाण्याने हात धुल्यामुळे कोरोना विषाणु नष्ट होत नाही तसेच नुसत्या पावसाने कोरोना विषाणुच्या क्षमतेवर कसलाही परिणाम होणार नाही. परिणाम याचा अर्थ असा की त्याची क्षमता कमी होणार नाही.
- पण धो-धो, मुसळधार पाऊस जर झाला तर, ज्या पृष्टभागावर असा धोधो पाऊस झालेला आहे , तो तो पृष्टभाग कोरोना विरहीत होण्यास मदत होऊ शकते. त्या पृष्टभागावरील विषाणु अन्यत्र वाहुन जाउ शकतो असा एक अंदाज अभ्यासकांत चर्चिला जात आहे.
- त्यामुळे पावसाचा आणि कोरोना विषाणुचा व त्याच्या प्रसाराचा काही संबंध आहे असे आता तरी सांगता येत नाहीये.
जसे उन्हाळ्यातील वाढलेल्या तापमानामुळे कोरोनाच्या प्रसाराला कसलाही आळा बसला नाही त्या प्रमाणेच पावसाळा व हिवाळ्यातील थंडी मुळे देखील कोरोना वर काही परिणाम होईल की नाही हे सांगता येत नाही. किंबहुना आता आपण हेच म्हणु शकतो की कोरोनाच्या प्रसाराचा व वातावरणाचा प्रत्यक्ष काही संबंध नाहीयेच मुळी.
मग कोरोनाच्या प्रसाराचा संबंध नक्की आहे कशाशी बरे? असे काय आहे की ज्यामुळे कोरोनाचा प्रसार थांबु शकतो? असे काय आहे की ज्यामुळे कोरोनाची लागण आपणास होण्याची शक्यता कमी होते? असे काय आहे की ज्यामुळे कोरोनाची लागण झालेली असताना देखील आपण लवकर बरे होऊ?
तर मित्रांनो मी पुन्हा एकदा सांगतो की, सोशल डिस्टंसिंग व तोंडाला मास्क/रुमाल लावणे हेच असे औषध आहे की ज्यामुळे आपला कोरोनापासुन बचाव होण्याची शक्यता ७०% टक्क्यांनी वाढते. सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यात कसली चुक झाली व कोरोनाचा संसर्ग हाताला झालाच तर तो हाताद्वारे नाकातोंडात जाऊ नये म्हणुन साबणाने वारंवार हात धुणे केले तर तुमच्या फुफ्फुसापर्यंत हा विषाणु पोहोचु शकणार नाही. सोबतच प्रतिकार शक्ति वाढवण्यासाठी योग्य आहार घेणे, प्रथिने घेणे, फायबर घेणे व हलका व्यायाम तुमच्या प्रकृतीमानानुसार करणे देखील खुप आवश्यक आहे.
त्यामुळे पावसाळा व कोरोनाचा नक्की संबंध काही आहे किंवा नाही हे जरी कालांतराने आपणास समजले तरी देखील प्रसार थांबवायचा असेल , स्वतःचे , स्वतःच्या कुटुंबाचे जर तुम्हाला या आजारापासुन रक्षण करायचे असेल तर तुम्ही सोशल डिस्टंसिंग, तोंडाला मास्क/रुमाल बांधणे व सारखे सारखे हात धुणे करीत रहावे लागेल.
धन्यवाद
आपला
महेश ठोंबरे
9923062525
Ref – Indian Express, Forbes ,Passport health USA