
कोरोना विषाणुचा कोविड-१९ आजार व प्रतिबंधात्मक उपाय – COVID-19 caused by CORONA virus
नमस्कार मंडळी
शाळेतुन घरी आल्यावर मुलाने माझ्या जवळ येणे टाळले, सोबत मला म्हणाला की आता हातात हात देखील मिळवायचा नाही. मी कारण विचारले तर तो म्हणाला की कोरोना व्हायरस आलाय व तो एका माणसाकडून दुस-या माणसामध्ये प्रवेश करतो. व दुसरा माणुस देखील आजारी पडतो. ठिक आहे म्हणुन मी देखील लांबच राहिलो. थोड्या वेळाने त्याला काहीतरी विचारायचे होते तर तो चक्क गळ्यात पडुनच मला विचारता झाला. माझा मुलगा विसरुन गेला होता त्याला शाळेत काय सुचना केल्या होत्या ते!
अर्थात मी ही त्याला कोरोनाची आठवण करुन दिली नाही आणि त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले. आम्ही बराच वेळ खेळलो, टिव्ही पाहिला. सगळे अगदी नेहमीप्रमाणेच.
पण त्याच्या शाळेतुन घरी आल्यानंतरच्या वागण्याने मला अस्वस्थ केले होते. कोरोना म्हणजे नक्की काय? तो आला कुठुन, आला कसा, चाल्लाय कुठे, त्याला करायचय काय, माणसांच काय होणार, काय ही एक महामारी आहे की काय, कोरोना वर अजुन इलाज कसा काय निघाला नाही, असे एक ना अनेक प्रश्न माझ्याच मनात काहुर माजवित राहिले. गेले दोन दिवस मी कोरोना या विषयावर बरेच वाचन केले. अनेक विडीयो पाहिले. चीन तसेच अमेरीकेतील संशोधन संस्थांची प्रसिध्दी पत्रके पाहीली, वाचली. या सर्वांतुन मी खालील निष्कर्षांप्रत पोहोचलो आहे.
- कोरोना विषाणु (व्हायरस ला मराठी मध्ये विषाणु म्हणतात) नवीन वगैरे नाहीये. हो तो मनुष्यासाठी नवीन आहे इतकेच
- कोरोना कुळातील अन्य काही विषाणुंनी मनुष्याच्या आरोग्यास, व जिवितास यापुर्वीही अपाय पोहोचवला होता
- हा एक परजीवी विषाणु आहे. याला स्वतःचे शरीर किंवा अवयव नसतात पुनरुत्पादनासाठी. जैव-रासायनिक क्रियां करुन पुनरुत्पादन करण्यासाठी त्याला यजमान (होस्ट सेल) पेशींची गरज असते. व अशा पेशी मनुष्याच्या शरीरात सहज उपलब्ध असतात, असे कदाचित उत्क्रांतीवादाच्या सिध्दांतानुसार, या जनुकांना समजले असावे, व नवीन यजमान म्हणुन ते मनुष्याकडे वळले. हे अगदी भुत-प्रेत-आत्मा(कोरोना विषाणु) व झपाटलेले झाड(मनुष्याचे शरीर) असे काहीसे झाले आहे.
- सन २००२ मध्ये कोरोना-सार्स (SARS) या विषाणुने अंदाजे आठ हजार लोकांना बाधित केले होते व त्यापैकी ७७४ लोक मरण पावले. म्हणजे मृत्युचा शेकडा होता ९.६ टक्के. सन २०१२ मध्ये कोरोना-मर्स (MERS) नावाचा कोरोना व्हायरस ने अडीच हजार लोकांना बाधले व ८५८ लोक मृत्युमुखी पडले होते. शेकडा दर होता ३४ टक्के. असाच आणखी एक विषाणु २०१४ मध्ये आढळला त्याचे नाव इबोला. इबोला मुळे अठ्ठावीस हजार लोक बाधले, पैकी ११,३१६ लोक मृत्यु मुखी पडले.
- चीन मधुन आलेला कोरोना व्हायरस ज्याला आंतरराष्ट्रीय समुदायाने नॉव्हेल कोरोना असे नाव दिले आहे, या विषाणू मुळे जो आजार होतो त्यास देखील नाव दिले गेले आहे. ते आहे कोविड-१९ (सन २०१९ मधील कोरोना व्हायरस डीसीज). या आजारामध्ये आजपर्यंत १२६६५२ लोकांना बाधले असुन मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ४६४० आहे. म्हणजे चार टक्क्याच्या आसपास मृत्युचा दर आहे. (https://www.worldometers.info/coronavirus/)
- हा विषाणु पॅंगोलिन नावाच्या खवले मांजरासारख्या प्राण्याच्या शरीरातुन मनुष्याच्या शरीरामध्ये प्रवेशता झाला असा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत अजुन एक वाक्यता झालेली नाही व अजुनही यावर अधिक संशोधन होत आहे. या विषाणूचे मुळ जितके लवकर सापडेल तितके लवकर मनुष्यास याच्या प्रतिबंधासाठी लस शोधणे सोपे होईल.
- कोणताही विषाणु (कोरोना देखील) एकटा जगु शकत नाही. म्हणजे तो सजीव नसतोच. विषाणु म्हणजे केवळ जनुकीय ज्ञानाचे तंतु असतात की जे प्रथिनांनी झाकोळलेले असतात. उघड्या डोळ्यांना ते दिसत नाहीत. त्यांना पाहण्यासाठी इलेक्ट्रॉन सुक्ष्मदर्शक वापरले जातात. या सुक्ष्मदर्शकातुन पाहिल्यावर याच्या भोवतीच्या आवरणाला शिरपेचाला (क्राऊन – CORONA) असतात अगदी तशी रचना दिसते. यामुळेच यांना कोरोना असे नाव दिले गेले.
- एखाद्या बाधित मनुष्याच्या शिंकेतुन तसेच खोकल्याद्वारे हे विषाणु, हवेत येतात. बाधित मनुष्यापासुन तीन फुट अंतराच्या आत असणा-या कोणत्याही सामान्य माणसास याचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येकाने खोकताना अथवा शिंकताना रुमाल वापरणे खुप महत्वाचे आहे. व तो रुमाल देखील स्वच्छ धुणे गरजेचे आहे, शक्यतो उकळत्या पाण्यातुन धुवले तर उत्तम.
- कदाचित एखाद्या बाधित माणसापासुन तुम्ही ब-याच अंतरावर देखील असलात तरीदेखील जर चुकुन तुम्ही त्या जागेमधुन वावरलात तर तुमच्या शरीराच्या उघड्या अंगावर ते विषाणु येऊ शकतात. शरीराच्या उघड्या भागावर ते बसल्याने फार नुकसान नाही. पण चुकुन तुमच्या हातावरील विषाणु, तुम्ही हाताने तोंड पुसायला गेलात तर मात्र तोंडांद्वारे तुमच्या श्वसननलिकेत प्रवेश करतो.
- त्यामुळेच टिव्ही, कॉलर ट्युन, जाहिरातींमध्ये हे वारंवार सांगितले जात आहे की वारंवार, दिवसातुन अनेकदा साबणाने हात स्वच्छ धुवा. हात तोंडाला, डोळ्यांना, कानांना अजिबात लावु नका. आपल्या शरीरामध्ये कोणत्याही विषाणुंचा संसर्ग या इंद्रीयांमधुनच होत असतो.
- ज्यांना आधीपासुनच कसले आजार आहेत अशांना लवकर संसर्ग होऊन जास्त नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे.
- धुम्रपान करणारे देखील संसर्ग होण्यास सोपे आहेत. व त्यांच्यावर या आजाराचे परिणाम खुपच वाईट होऊ शकतात, कारण हा विषाणु श्वसनमार्गावरच आक्रमण करतो व धुम्रपान करणारांचा श्वसनमार्ग आधीच क्षतीग्रस्त झालेला असल्याने, या विषाणूला, मनुष्याच्या शरीरातील पेशीचा ताबा घेणे अधिक सोपे होते.
- आपण ज्या वस्तुंना नेहमी स्पर्श करतो अशा वस्तुंना देखील डिसैंफेक्ट म्हणजे निर्जंतुक करुनच वापरा.
- ज्यांना खोकला सर्दी आहे अशा माणसांपासुन किमान एक मीटर म्हणजे तीन फुट इतके अंतर ठेवा. हस्तांदोलन, गळाभेट धोकादायक आहे.
- कुणाला जर साधारण सर्दी खोकला असेल तर त्यांनी आवर्जुन तज्ञ सरकारी डॉक्टरांना भेटले पाहिजे. सोबतच नेहमीच्या आरोग्य स्वच्छतेच्या गोष्टी अधिक लक्षपुर्वक पाळल्या गेल्या पाहिजेत.
- हा आजार (covid-19) ज्या विषाणू मुळे होतो त्या विषाणुला आळा घालण्याचे काम सध्या तरी आपल्या शरीरातील रोग रतिकारक शक्ति तसेच इतर औषधे करीत आहेत. अजुनही यावर ठोस असे औषध किंवा लस बनविली गेली नाहीये.
- ज्या पध्दतीने हा आजार प्रसारीत होतो आहे, त्याचा वेग खुपच जास्त आहे. जगभर याचे पडसाद दिसु लागले आहेत. प्लेग सारख्या भयंकर रोगाराई सारखी स्थिती तर निर्माण होणार नाही ना यामुळ अशी शंका येऊ शकते. पण अशी काळजी करण्याचे कारण नाही. याचे कारण असे आहे की जग अशा संकटांना सामोरे जाण्यासाठी, पुर्वीपेक्षा खुप जास्त तयार आहे. संसर्गजन्य रोगांचा प्रसार होऊ नये म्हणुन ज्याप्रमाणे संशोधने होत आहेत त्याचप्रमाणे, प्रतिबंधात्मक उपाय काय केले पाहिजेत याबाबतीत लोकांत खुप मोठ्या प्रमाणावर जागरुकता माहिती तंत्रज्ञान साधनांद्वारे , शासकिय-निमशासकिय पातळ्यांवर निर्माण केली जात आहे.
- वर जे आकडेवारी, टक्के वारी दिली आहे, यात ९०% लोक मृत्यु मुखी पडले नाहीत असेही दिसुन येते आहे. त्यामुळे या आजाराला घाबरुन जाण्याचे अजिबात कारण नाही. पण आपण सर्वांनी योग्य ती काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
अधिकाधिक लोकांपर्यंत हि माहिती अवश्य पोहोचवा. सध्यातरी प्रतिबंध हाच उपाय असल्याने, प्रतिबंधाचेच काम आपण सारे मिळुन करुयात. या बाबत अधिकृत माहिती (मी लिहिलेली आहेच इथे) तुम्हाला भारत सरकारच्या वेबसाईट वर देखील वाचता येईल.
अर्थात मी माझ्या मुलाला देखील हे सर्व नीट समजावुन सांगितले आहेच. तुम्ही देखील आपल्या कुटुंबास, मित्र परिवारास, हे सर्व समजावुन सांगा. केवळ व्हॉट्सॲप मेसेज फॉरवर्ड करुन हे होणार नाही.
कळावे
Mahesh and Pallavi Thombare
Fitness coaches from Pune.
Author of this FACT-CHECK is a well-known fitness coach from Pune. He has helped thousands of people with weight loss and weight gain. He runs a fitness club, weight loss centre in Hadapsar and Kothrud, Pune. Please feel free to contact him by submitting details below.
Ajay
आपण लिहिलेला लेख आणि दिलेली माहिती खूप छान ! Thanks for sharing valuable article