
खेळपटु, व्यायामपटुंसाठी योग्य व पोषक आहार – भाग ३
आपणाकडे काही गोष्टींचे महत्व फक्त त्या फुकट आहेत म्हणुन कमी झालेले आहे. त्यातीलच एक म्हणजे पाणी. भरपुर पाणी पिण्याने निरोगी राहण्यास मदत होते असे अनेक संशोधनामधुन गेल्या अनेक वर्षांत पुढे आले आहे. फक्त निरोगी राहण्यासाठीच नाही तर, फिटनेस हे ज्यांचे ध्येय आहे, जे फिटनेस फ्रीक आहेत, जे वेगवेगळ्या खेळांत मध्ये निपुण आहेत, व दररोज मैदानावर घामा गाळतात. जिम मध्ये घामाघुम होतात अशा सर्वांसाठीच पाणी इतर कोणत्याही न्युट्रिशन इतकेच महत्वाचे आहे. पण ते मोफत किंवा अगदी क्षुल्लक किमतीमध्ये मिळत असल्याने आपणास पाण्याचे आरोग्य मुल्य काय आहे ते नेमकेपणाने समजत नाही.
माझ्या आजवरच्या अनेक वर्षांच्या अनुभवात मला हजारो लोक भेटले की ज्यांना वजन कमी करायचे होते, आहे. या पैकी किमान ५० टक्के लोकांच्या काही तक्रारी असतात व या तक्रारी सर्वांच्या सारख्याच असतात. जसे डोके दुखी, थकवा, जिम मध्ये अपेक्षित व्यायाम न होणे, त्वचेच्या समस्या, इत्यादी. जेव्हा मी प्रत्येकाशी या तक्रांरीविषयी अधिक जाणुन घेतो तेव्हा मला समजते की या सर्व लोकांच्या बहुतांश समस्येचे मुळ “आवश्यक पाणी न पिणे” हेच असते. तुम्हाला माहित आहे का आपले शरीर ६० टक्के पाण्याचे बनले आहे. जर असे असेल तर शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ देणे म्हणजे आरोग्याशी खेळणे होय.
जिवंत राहण्यासाठी आपणास पाण्याची गरज असते. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी , प्रत्येक अवयवाला पाण्याची आवश्यकता असते. पाण्याचा योग्य वापर करुन आपले शरीर, एकंदरीत तापमान नियंत्रित करीत असते आपल्या शरीराचे. तसेच पचनक्रियेमध्ये देखील पाणी खुप महत्वाची भुमिका निभावते. आपण जे अन्न खातो ते अन्न शरीरात शोषुन घेण्यामध्ये देखील पाण्याची भुमिका महत्वाची आहे. आपल्या हाडांमधील सांधे पाण्याच्या योग्य प्रमाणामुळे व्यवस्थित कार्य करीत असतात. मल विसर्जनाच्या प्रक्रियेमध्ये देखील पाणी सर्वात महत्वाची भुमिका निभावते. एवढी सगळी कामे पाण्यामुळे सुरळीत होत असतात. यावरुन तरी आपणास आता पाण्याचे मुल्य समजावे.
या सोबतच, फिटनेस फ्रीक लोकांच्या उत्तम आरोग्यासाठी व व्यायाम, क्रिडा प्रकारामध्ये योग्य कामगिरी साठी पाणी खुप महत्वाचे आहे. आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण नेहमी कमी होत असते. ते फक्य लघवीमुळे कमी होते असे नाही तर घाम, श्वासोच्छवास यामुळे देखील पाणी कमी होत असते. या सर्व पाण्या कमी होण्याच्या क्रिया अधिक जलद गतीने होतात जेव्हा आपण शारीरीक हालचाली करीत असतो. आणि व्यायाम, खेळाचा सराव करताना आपण जेवढे कार्यरत असतो तेवढे इतर कधीच नसतो, याचा अर्थ असा होतो की व्यायाम करताना आपल्या शरीरातील पाणी खुपच जलद गतीने कमी होत असते. व नेमके त्यावेळीच आपणास पाण्याची अधिक गरज असते.
आपले शरीर आपणास, शरीरातील पाणी कमी झाल्याचे संकेत देत असते. पण असे संकेत मिळेपर्यंत वाट पहाणे शहाणपणाचे अजिबात नसते. दिवसभर पाणी प्यावे आणि व्यायाम आदी करताना विशेषकरुन जास्त पाणी प्यावे. पण खालील पैकी कोणतेही लक्षण तुम्हाला जाणवले तर मात्र जरा जास्तच पाणी प्यावे.
खालील पैकी लक्षणे जाणवण्याआधीच भरपुर पाणी पिणे महत्वाचे आहे.
- घश्याला कोरड पडणे
- डोकेदुखी
- अनिद्रा
- थकवा
- कमी व्यायाम किंवा सराव – व्यायाम करण्यामध्ये मन न लागणे
- लक्ष केंद्रीत होण्यात अडचण येणे
- त्वचेच्या समस्या
- लघवीचा रंग बदलणे
पुरेसे पाणी पिण्याने आपल्या एकंदरीत आरोग्यावर सकारात्मक परिणाम होत असतो. अजुन जी तुम्हाला पाण्याचे महत्व पटत नसेल तर पुढे वाचा!
व्यायाम केल्यानंतर तुमच्या स्नायु मध्ये लचक, ताण येतो का?
व्यायाम केल्यानंतर तुम्हाला चक्कर आल्यासारखे वाटते का?
व्यायाम केल्यानंतर तुम्हाला थकवा येतो का?
तुम्ही जर अर्धा तासापेक्षा जास्त व्यायाम करीत असाल रोज तर एका व्यायामानंतर तुमच्या शरीरातील एक चतुर्थांश पाणी संपते. पाण्याचा समतोल बिघडल्यामुळेच स्नायुंमध्ये क्रॅंप्स येतात तसेच थकवा येतो. तसेच ऊर्जेची कमी देखील आपणस जाणवु शकते. त्यामुळे व्यायाम करण्यापुर्वी, करते वेळी अव केल्यानंतर भरपुर पाणी पिऊन, शरीरातील पाण्याचा समतोल राखणे खुप महत्वाचे असते.
आपल्या शरीरातील काही कमकुवत स्नायुंची उतके (टिश्यु) हे ७५% पाण्याने बनलेले असतात. त्यामुळे जेव्हा शरीरातील पाण्याचा समतोल बिघडतो, म्हणजे पाणी कमी होते तेव्हा नेमके हेच स्नायु लवकर थकतात व योग्य प्रकारे कार्य करीत नाहीत. त्यामुले खेळपटु, व्यायामपटु साठी स्नायुम्चे कार्य नीट होऊन त्या त्या खेळ व व्यायामात अधिक सराव व प्रदर्शन करणे यासाठी पाणी खुप महत्वाचे आहे. त्यामुळे व्यायाम करतेवेळी जेव्हा तुम्हाला नको नकोसे वाटायला लागते तेव्हा लागलीच पाणी प्यावे.
यातील आणखी एक तांत्रिक बाब देखील समजुन घ्यावी आपण सर्वांनी. आपले हृद्य, आपल्या सक्रिय स्नांयु मधुन रक्त घेण्यासाठी कार्य करीत असते. जेव्हा स्नायुंमध्ये पुरेसे पाणी नसते तेव्हा साहजिकच रक्तामध्ये देखील पाण्याचा अभाव होतो व त्यामुळे रक्ताचे प्रमाण व रक्ताचा दबाव दोन्हीही कमी होते. व याचाच परिणामस्वरुप आपणास थकवा येतो व चक्कर आल्यासारखे वाटते किंवा चक्कर येते देखील.
त्यामुळे चांगले दिसण्यासाठी, चांगले असण्यासाठी व अधिक चांगला व्यायाम करण्यासाठी भरपुर पाणी प्या.
वरील सर्व माहिती जर तुम्हाला मनापासुन पटली असेल तर खालील काही युक्त्या तुम्हाला भरपुर पाणी पिण्याची सवय लागण्यासाठी मदत करतील
- रात्री झोपण्यापुर्वी व सकाळी उठल्या उठल्या जास्तीत जास्त पाणी प्या
- कामावर जाताना सोबत पाण्याची बाटली अवश्य ठेवा
- आपण किती पाणी पितोय याचे मोजमाप करता आले तर अधिक उत्तम, यासाठी नवनवीन ॲप्स उपलब्ध आहे किंवा बाटलीच्या मापावरुन देखील मोजमाप करता येईल.
- पाण्याची कमतरता भरुन येण्यासाठी कधी कधी लिंबु पाणी पिऊ शकता
- व्यायाम करते वेळी, करण्यापुर्वी व केल्यानंतर पाणी प्या
- भुक लागल्यावर आधी पाणी प्या व मग किमान अर्ध्या तासाने जेवण करा
- आपण जे अन्न खातो त्यातुन देखील आपल्या शरीरास पाणी मिळते पण शरीरातील पाण्याची कमी भरुन काढण्यासाठी खाणे योग्य नाही कारण अन्न सोबत अधिकच्या कॅलरीज देखील शरीरामध्ये जातात.
- फळे, भाज्या अधिक खाण्याने देखील पाणी मिळु शकते. आपल्या नेहमीच्या आहाराम्ध्ये यांचा समावेश वाढवणे
- फळांचा रस, उसाचा रस (बर्फ व साखर न टाकता) हे देखील चांगले आहे
- सॉफ्ट ड्रिंक्स, एनर्जी ड्रिंक्स टाळणे! अजिबात नकोत.
शरीरातील पाणी कमी झाल्यावर, पाण्यासारखे दुसरे काहीच नाही हे लक्षात ठेवा. त्यामुळे शरीरातील पाण्याचा समतोल राखण्यासाठी, लक्षणांची वाट न पाहता ‘पाणीच’ पिणे महत्वाचे आहे.
तुम्ही जर खेळपटु, व्यायामपटु, फिटनेस फ्रीक असाल व तुम्हाला तुमच्या आहार, पाणी इत्यादी विषयी काहीही माहिती हवी असल्यास अवश्य संपर्क साधा आमच्याशी